आजपासून शाळांचा प्रारंभ, पण विद्यार्थ्यांनाच नो-एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 05:00 AM2021-06-28T05:00:00+5:302021-06-28T05:00:02+5:30
२८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकराव्या वर्गाच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर दहावी आणि बाराव्या वर्गाच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु विद्यार्थ्याविना सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव टळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शैक्षणिक वर्ष बदलले. आता सोमवारपासून नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत आहे. जिल्ह्यातील तीन हजारांपेक्षा अधिक शाळांचे दार उघडणार असले तरी नव्या सत्राची सुरुवात मात्र विद्यार्थ्यांविना होणार आहे. केवळ शिक्षकांची शाळेत उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
२८ जूनपासून शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिली ते नववी आणि अकराव्या वर्गाच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर दहावी आणि बाराव्या वर्गाच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु विद्यार्थ्याविना सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या दिवसाचा प्रवेशोत्सव टळणार आहे.
मागच्या वर्षाच्या अभ्यासाची उजळणी करणार
n सोमवारपासून शाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीच्या राहिलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने निर्माण केलेल्या ऑनलाईन ब्रीज कोर्सचे सोमवारी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. त्यानंतर हा अभ्यासक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पोहोचणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे मागील वर्षी झालेले अभ्यासाचे नुकसान भरून निघणार आहे.
जिल्हा परिषद शाळांप्रमाणेच नगरपरिषदेच्या शाळांमध्येही ऑनलाईनच शिकविले जाणार आहे. त्यासाठी शिक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या. मात्र या पद्धतीमध्ये गोरगरीब तसेच मागासगर्वीय घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची शासनाने काळजी घेतली पाहिजे. सत्र सुरू होतानाच विद्यार्थ्यांना सुविधा द्याव्या. आम्ही मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी शाळेत सॅनिटायझर व अन्य तयारी पूर्ण केली आहे. अध्यापनही करू.
- राजेंद्र वाघमारे
विभागीय अध्यक्ष,
कास्ट्राईब शिक्षक संघटना
सध्या सर्वच शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे. जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कुठलीही शाळा ऑफलाईन विद्यार्थ्यांना बोलविणार नाही. मात्र शिक्षक शाळेत जावून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, इच्छुकांना टीसी देणे, पुस्तक वाटप, वृक्षारोपण, सॅनिटायझेशन व अध्यापन ही कामे करतील. नवी पुस्तके उशिरा येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडील जुनी पुस्तके आपआपसात वाटून देण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
- प्रमोद सूर्यवंशी
शिक्षणाधिकारी, यवतमाळ