उन्हाळी सुट्टीत मुलांना इस्रो बनवणार शास्त्रज्ञ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:26 AM2019-03-10T06:26:41+5:302019-03-10T06:27:08+5:30
संशोधनाची अनोखी संधी; देशभरातील विद्यार्थ्यांमधून निवडणार ‘यंग सायन्टिस्ट’
- अविनाश साबापुरे
यवतमाळ : उपजत कुतूहल आणि शोधक वृत्ती असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात चक्क शास्त्रज्ञ बनण्याची संधी मिळणार आहे. हो, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. येत्या उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्यक्ष इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन कार्य बघता येणार असून स्वत:ही संशोधन करता येणार आहे.
तरुण, नव्या दमाचे शास्त्रज्ञ पुढे यावे, या उद्देशाने इस्रोने (इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन) यावर्षीपासून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायन्टिस्ट प्रोग्राम’ सुरू केला आहे. याअंतर्गत देशातील निवडक शंभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन केंद्रात ठेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स आणि स्पेस अप्लीकेशन्स या विषयांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देणे, त्यातून त्यांच्या मनात अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे.महाराष्ट्रातून या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून इस्रोने शासनाला सूचित केले आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्य
संपूर्ण वर्षभरातील विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, अवांतर उपक्रमांमधील सहभाग महत्त्वाचा असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देशही आहेत.
कुणाला मिळेल संधी
देशातील प्रत्येक राज्यातून किमान ३ विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी निवड होणार आहे. महाराष्ट्रातील राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईच्या कोणत्याही शाळेतील विद्यार्थी या मोहिमेसाठी अर्ज करू शकतो. मात्र तो विद्यार्थी यावर्षी नवव्या वर्गात शिकत असलेला हवा. विद्यार्थ्यांनी १४ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर राज्य शासनातर्फे ही नावे २५ मार्चपर्यंत इस्रोला पाठविली जाईल, असे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी कळविले. उन्हाळी सुटीत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण इस्रो आयोजित करणार आहे. त्यात प्रत्यक्ष विज्ञान प्रात्यक्षिकांसह नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव कथन, इस्रोच्या प्रयोगशाळांची पाहणी, त्यात विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात भाग घेण्याची संधी मिळणार आहे.