वणीवर ‘स्क्रब टायफस’चे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:01 PM2018-08-25T22:01:42+5:302018-08-25T22:02:17+5:30
वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वणी शहरात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य असून केवळ स्क्रब टायफसच नाही, तर डेंग्यू, मलेरियासारखा आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच स्क्रब टायफसने एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरवर्षीच पावसाळ्यात वणी शहरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. यंदा मात्र ‘स्क्रब टायफस’ने वणी शहरात शिरकाव केल्याने सामान्य माणसांसह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. या आजारापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्वरित उपचार करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मागील दोन वर्षांत स्वॉईन फ्ल्यू या आजाराची अनेकांना बाधा झाली होती. त्यात काहींचा मृत्यूही झाला होता. आता स्क्रब टायफसने वणीत वृद्ध महिलेचा बळी घेतल्याने सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर अच्छता आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे आहेत. नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जागृती नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरात अनेक ठिकाणी मोकळी मैदाने आहेत. त्या ठिकाणी गवतासह अन्य झुडपेही मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. त्यामुळे स्क्रब टायफस आजाराच्या जिवाणूंचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे स्क्रब टायफसचे जिवाणू गवतामध्ये आढळून येतात. या जिवाणूचा डंख झाल्यानंतर त्याचे विष हळूवार शरिरात पसरते. त्यानंतर शरिरातील प्रतिकार शक्ती कमी होऊन एक-एक अवयव निकामी होऊ लागतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास प्रसंगी रुग्ण दगावतो.
वणी तालुक्यात यापूर्वीही आढळले होते रुग्ण
यापूर्वीदेखील वणी तालुक्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले होते. मात्र योग्य उपचार मिळाल्याने ते या आजारातून बरे झालेत, अशी माहिती येथील डॉ.गणेश लिमजे यांनी ‘लोकमत’ला दिली. नागरिकांनी या विषयात जागृत राहून परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.