पोलीस कुटुंबीयांचा सुरक्षेसाठी आक्रोश

By admin | Published: September 20, 2016 01:55 AM2016-09-20T01:55:42+5:302016-09-20T01:55:42+5:30

पोलीस हा पेशाच जरब बसविणारा. पण या खाकी वर्दीतल्या तगड्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच समाजातील

Screaming for police protection | पोलीस कुटुंबीयांचा सुरक्षेसाठी आक्रोश

पोलीस कुटुंबीयांचा सुरक्षेसाठी आक्रोश

Next

एसपी कार्यालयावर मोर्चा : पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांवर पायबंद घाला
यवतमाळ : पोलीस हा पेशाच जरब बसविणारा. पण या खाकी वर्दीतल्या तगड्या पोलीस कर्मचाऱ्यांनाच समाजातील कुप्रवृत्तीने लक्ष्य केले आहे. काही दिवसात पोलिसांवरील हल्ले वाढले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेवटी समाजाला सुरक्षा पुरविणाऱ्या पोलिसांच्या नातेवाईकांनाच सोमवारी मोर्चा काढावा लागला. अन् आपल्याच कुटुंबीयांच्या मोर्चाच्या बंदोबस्तात तैनात राहण्याची विचित्र वेळ पोलिसांवर आली.
पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश पाहून सर्वसामान्य यवतमाळकर नागरिक मात्र अवाक् झाले. येथील पळसवाडी कॅम्प परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या वसाहतीत कोणत्याही समस्या नसतील, असे सर्वसामान्यांना वाटते. मात्र, येथे राहणारे कुटुंबीय नानाविध प्रश्नांच्या जंजाळात अडकले आहेत. घरातील कर्ता पुरुष ड्यूटीवर गेला की परतण्याची वेळ निश्चित नाही. आल्यावरही पुन्हा कधी बोलावले जाईल, याचा नेम नाही. अशा अवस्थेत घरी राहणाऱ्या महिला, मुले यांच्यात एकारलेपणाची भावना वाढत आहे.
अशातच महाराष्ट्रात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसात वाढलेल्या या घटनांनी कुटुंबीय हादरले आहेत. मुंबईत वाहतूक शाखेचे कर्मचारी विलास शिंदे यांचा अशाच हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर विविध शहरात अशा घटनांचे लोण पसरत चालले आहे. या घटनानंतरही पोलीस कर्मचारी धैर्य बाळगूनच आहेत. मात्र, त्यांचे कुटुंबीय काही पोलीस नाहीत. तेही सर्वसामान्य नागरिकच आहेत. आपल्या पतीविषयी, वडिलांविषयी त्यांना काळजी वाटते. या दहशतीच्या भावनेतूनच येथील पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीतून सोमवारी मोर्चा काढण्यात आला. पोलीस कुटुंब संघर्ष समितीने हा मोर्चा काढला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्धांगिणी, मुले, मुली यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दरवेळी कोणत्याही मोर्चात बंदोबस्तासाठी पोलीस तैनात असतात. पण सोमवारी त्यांना आपल्याच बायका-मुलांनी काढलेल्या मोर्चात बंदोबस्तासाठी तैनात व्हावे लागले. आधीच समस्यांचा सामना करणाऱ्या पोलिसांची अवस्था या ‘कौटुंबिक’ मोर्चाने अधिकच अवघड बनली होती. (स्थानिक प्रतिनिधी) (अधिक वृत्त/४)

लोकमतचे मानले आभार
४मोर्चेकऱ्यांची एलआयसी चौकात सभा झाली. यावेळी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध समस्यांचा ऊहापोह करण्यात आला. ‘लोकमत’ने पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने लावून धरले. याबद्दल यावेळी मोर्चातील पोलीस कुटुंबीयांनी ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Screaming for police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.