गंभीर रुग्णाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:37+5:30
वणीच्या ग्रामीण रुग्णालयात चक्क ‘होमक्वारंटाइन’ चा शिक्का मारण्यात आला. यामुळे भयापोटी दोन दिवस उपचाराविना घरातच थांबून असलेल्या सदर महिलेचा चंद्रपूरला नेताना तिसऱ्या दिवशी वाटेतच मृत्यू झाला. या साºया प्रकाराने मृत महिलेच्या कुटुंबाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : उच्च रक्तदाब, मधुमेह व न्युमोनियाने प्रकृती गंभीर बनलेल्या एका महिला रुग्णाला नागपूर किंवा चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला एका खासगी डॉक्टरने दिल्यानंतही सदर महिला रुग्णाच्या हातावर वणीच्या ग्रामीण रुग्णालयात चक्क ‘होमक्वारंटाइन’ चा शिक्का मारण्यात आला. यामुळे भयापोटी दोन दिवस उपचाराविना घरातच थांबून असलेल्या सदर महिलेचा चंद्रपूरला नेताना तिसऱ्या दिवशी वाटेतच मृत्यू झाला. या साºया प्रकाराने मृत महिलेच्या कुटुंबाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
आशा बुधाजी काळे (४३) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. त्या भालर येथील वेकोलिच्या रुग्णालयात सुरक्षा विभागात कार्यरत होत्या. त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता. २९ एप्रिलला अस्वस्थ वाटू लागल्याने आशा काळे यांनी वणीतील एका खासगी रुग्णालय गाठले. तेथे तपासणीअंती उच्च रक्तदाबासह न्युमोनियाचे निदान करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने ग्रामीण रुग्णालयाचे प्रमाणपत्र घेऊनच शासकीय रुग्णवाहिकेने नागपूरला जा, असेही खासगी डॉक्टरांनी सुचविले. त्यानुसार त्या येथील ग्रामीण रुग्णालयात ेगल्या. मात्र तेथे ग्रामीण रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी त्यांच्या हातावर थेट ‘होम क्वारंटाइन’चा शिक्का मारला. परिणामी आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, या शंकेने त्या अस्वस्थ झाल्या. ग्रामीण रुग्णालयाने हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारल्याने उपचार घेण्याऐवजी त्यांनी स्वत:चे घर गाठले. दोन दिवस त्या घरातच थांबून होत्या. भयापोटी त्यांनी ही बाब कुणालाही सांगितली नाही. मात्र १ मे रोजी त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांच्या मुलीने लगेच वणीत राहणारे मामा दिलीप जुनघरी व चुलत मामा संजय जुनघरी यांना फोन करून आईच्या प्रकृतीची माहिती दिली. लगेच हे दोघेही घरी पोहचले. त्यांनी आशा काळे यांना तातडीने वणीतील खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आणले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून नागपूर किंवा चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. तेथून लगेच आशा काळे यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपस्थित डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे थातूरमातूर तपासणी करून पुढील उपचारासाठी नागपूरला नेण्याबाबत पत्र दिले. आशा काळे यांना चंद्रपूरला नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका १०८ देण्यात आली खरी; परंतु लाख विनवण्या करूनही सोबत डॉक्टर किंवा नर्स देण्यात आली नाही. डॉक्टर रजेवर असल्याचे यावेळी आशा काळे यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या भावंडांना सांगण्यात आले. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयातून आॅक्सीजन युनिट देण्यात आले. मात्र या युनिटची रिफील अर्धीच होती, असे संजय जुनघरी यांनी सांगितले. परिणामी हे युनिट केवळ पुनवटपर्यंत कार्यान्वित होते. त्यामुळे घुग्घूसला पोहचण्याअगोदरच आशा काळे यांचे निधन झाले. हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का असल्याने तब्बल दोन दिवस त्यांचे पार्थिव चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात ठेवून होते. कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पार्थिव ३ मे रोजी कुटुंबाच्या हवाली करण्यात आले.