‘मेडिकल’चा आयोडिन साठा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:58 PM2018-04-07T21:58:36+5:302018-04-07T21:58:36+5:30
जखम निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या आयोडिनचा येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साठा औषधी प्रशासन विभागाने सील केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जखम निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या आयोडिनचा येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साठा औषधी प्रशासन विभागाने सील केला आहे. सदर आयोडिन बोगस असल्याचे आढळून आल्याने वापर थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक बाब म्हणून आयोडिन सोल्यूशनची स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली. आयोडिन सोल्यूशनचा वापर जखम निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. सर्जरी आणि इतर विभागातही आयोडिनचा वापर करण्यात येतो. शासन स्तरावरून बहुतांश औषधांचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर खरेदी प्रक्रिया केली जाते. पोव्हीडॉन आयोडिन सोल्यूशन या कंपनीकडून मेडिकलसाठी आयोडिनची खरेदी करण्यात आली. अर्धा लिटर बॉटलची किंमत १८० रुपये आहे. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या या आयोडिनची मुदत येत्या आॅक्टोबर महिन्यात संपणार आहे.
सध्या वापरात असलेल्या आयोडिनच्या गुणवत्तेबाबत अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना संशय आला. त्यांनी त्याची पडताळणी केली. तेव्हा त्यात अधिक प्रमाणात चक्क पाणी आढळून आले. त्यांनी तत्काळ औषधी प्रशासनाला सूचना देऊन आयोडिनचे नमुने स्वाधीन केले. हे आयोडिन सोल्यूशन अलकेमिस्ट रिमेडीज प्रा.लि. देवाज या कंपनीचे आहे. याचा पांढरकवडा रोडवरील एका एजंसीकडून पुरवठा करण्यात आला होता. पुरवठादार एजंसीने जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे सोल्यूशन दिल्याचे निष्पन्न झाले. आता हे आयोडिन सील करण्यात आले असून त्याचा वापर थांबविण्याची सूचना औषधी प्रशासन विभागाने दिली आहे. पुरवठादार एजंसी व निर्माता कंपनीवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
अधिष्ठाता डॉ. श्रीगिरीवार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रुग्णांवर होणारा विपरित परिणाम टाळता आला.