पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘एसीबी’चा सर्च

By admin | Published: July 23, 2016 12:04 AM2016-07-23T00:04:07+5:302016-07-23T00:04:07+5:30

जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या आरटीओच्या पिंपळखुटी चेक पोस्टवरून चिरीमिरी घेऊन ओव्हर लोड वाहने बिनबोभाटपणे सोडली जातात.

Search ACB on pimple check post | पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘एसीबी’चा सर्च

पिंपळखुटी चेक पोस्टवर ‘एसीबी’चा सर्च

Next

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : चिरीमिरीची चौकशी
यवतमाळ : जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या आरटीओच्या पिंपळखुटी चेक पोस्टवरून चिरीमिरी घेऊन ओव्हर लोड वाहने बिनबोभाटपणे सोडली जातात. हा प्रकार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन राबवून उघडकीस आणला. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून एसीबीच्या पथकाने बुधवारी चेक पोस्टचा सर्च केला.
पिंपळखुटी चेक पोस्टवरून अनेक वाहनांची तपासणी न करताच थेट सोडून दिले जाते. १३ जून रोजी सकाळी ५.३० वाजता रायपूर येथून आलेला ट्रेलर क्र. जी.जे.२२-टी-०७६९ आणि जी.जे.०६-एव्ही-७४५५ हे ओव्हर लोड असलेले ट्रेलर २० हजार रुपये घेऊन सोडून देण्यात आले. याउलट सदर ट्रेलरला गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे असलेल्या आरटीओ चेक पोस्टवर दंड ठोठावण्यात आला होता. शिवाय आदिलाबाद चेक पोस्टवरही हे ट्रेलर थांबविण्यात आले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने पुराव्यानिशी वृत्ताच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. शिवाय ट्रेलर चालकाचा व्हीडीओही काढला होता. त्याने पिंपळखुटी चेक पोस्टवर पैसे घेणाऱ्या वाहतूक निरीक्षकाचा नामोल्लेख केला होता. या वृत्तानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत परिवहनच्या अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली. नेमका काय प्रकार आहे याची चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकांना दिली. या आदेशानंतर एसीबीचे उपअधीक्षक नासीर तडवी यांनी सहायक पोलीस निरीक्षक नितीन लव्हेकर यांच्या पथकाला पिंपळखुटी चेक पोस्टचा सर्च घेण्याचे आदेश दिले. यावरून बुधवारी संपूर्ण दिवसभर एसीबीचे पथक पिंपळखुटी चेक पोस्टवर होते. त्यांनी येथे १३ जून रोजी कोण वाहतूक निरीक्षक कार्यरत होता याची माहिती घेतली. शिवाय खासगी एजंसीच्या सुरक्षा रक्षकाचे बयान नोंदविले. या बयानामध्ये काही कर्मचाऱ्यांनी सदर ट्रेलर हे बॅरेकेटस् तोडून गेल्याचे सांगितले आहे. कर्तव्यावर असलेले वाहतूक निरीक्षक चेक पोस्टवर उपस्थित नव्हते ते ट्रेनिंगसाठी गेले आहेत. शिवाय १३ जून रोजी कर्तव्यावर असलेल्या परंतु बुधवारी गैरहजर आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसीबीने चौकशीसाठी कार्यालयात बोलविले आहे.
यावरून परिवहन विभाग आणि चेक पोस्टवर असलेल्या खासगी सुरक्षा एजंसीकडून लपवाछपवी केली जात असल्याचा संशय बळावला आहे. यातील परिवहन अधिकाऱ्यांचे बयान नोंदविल्यानंतर पुन्हा उलट तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

सीसीटीव्ही फुटेजचा बॅकअपच नाही
या चेक पोस्टवर ३२ मेगाफिक्सलचे दहा सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. तीन कॅमेरे प्रशासकाच्या कक्षासमोर आहे. यातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी एसीबीच्या पथकाने केली. मात्र खासगी एजंसीच्या ताब्यात असल्याने त्यांनी यातील फुटेज उपलब्ध करून दिले नाही. सीसीटीव्हीमध्ये केवळ तीन दिवसाच्या फुटेजचा बॅकअप राहत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे संशय बळावल्याने एसीबीच्या पथकाने तेलंगणामधील डोर्ली येथे असलेल्या टोल नाक्यावर चौकशी केली, त्या ठिकाणी सदर क्रमांकाचे वाहन पास झाल्याची एन्ट्री आढळून आली. चेक पोस्टवर डिलिंग करणारा आदिलाबादचा अजहर कुरेशीसुद्धा रडारवर आहे.

 

Web Title: Search ACB on pimple check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.