दोन व्यापाऱ्यांकडे ‘आयकर’चा सर्च
By admin | Published: November 1, 2014 01:13 AM2014-11-01T01:13:08+5:302014-11-01T01:13:08+5:30
कर चुकविल्याच्या (चोरी) संशयावरून आणि गोपनीय माहितीवरून यवतमाळातील दोन व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सर्च घेतला.
यवतमाळ : कर चुकविल्याच्या (चोरी) संशयावरून आणि गोपनीय माहितीवरून यवतमाळातील दोन व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सर्च घेतला. त्यामध्ये संबंधित व्यापाऱ्यांची घरे आणि कार्यालयांची झडती घेण्यात आली. सकाळी १० वाजतापासून सुरु झालेली ही कारवाई वृत्त लिहिस्तोवर सुरूच होती. दिवाळीच्या आदल्या दिवशी दोन व्यापाऱ्यांकडे आयकरने सर्च केला होता. आठवड्यात ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे येथील स्थानिक व्यापाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
भरत दत्ताणी आणि विपूल पटेल दोघेही रा. चर्च रोड असे सर्च झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. त्यांचे दोघांचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. व्यवसायातील उत्पन्न कमी दर्शवून त्यांनी मोठ्या प्रमाणात आयकर चुकविल्याची गोपनीय माहिती नागपूर आणि यवतमाळ येथील आयकर विभागाकडे होती.
त्यावरून संयुक्त पथकाने भरत दत्ताणी यांच्या चर्च रोडवरील घरी आणि स्टेट बँक चौकातील सुपर बाजार मार्केटमधील कार्यालयात तर विपूल पटेल यांच्या चर्च रोडवरील घर आणि कार्यालयात एकाचवेळी सर्च राबविला. यावेळी महत्वाचे दस्तावेज आणि संगणकातील माहितीची पथकाने बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये काही महत्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले.
सकाळी १० वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने दिवाळीच्या पूर्व संध्येला येथील सराफा बाजारातील शाह आभूषण आणि शाह ज्वेलर्समध्ये सर्च राबविला होता.
आठवडाभरात संयुक्त पथकाव्दारे ही दुसरी प्रभावी कारवाई आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तलिहिस्तोवर सर्च सुरच होता. (स्थानिक प्रतिनिधी)