साहित्य संमेलनासाठी नव्या उद्घाटकाचा शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 05:37 AM2019-01-09T05:37:10+5:302019-01-09T05:37:44+5:30
महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार, विठ्ठल वाघ यांची नावे चर्चेत
यवतमाळ : ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी नव्या उद्घाटकाचा शोध सुरू केला आहे. आयोजन समितीने ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, प्रसिद्ध साहित्यिक तथा लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार, कवी विठ्ठल वाघ व अन्य तीन-चार नावे महामंडळाला सुचविल्याचे संमेलन कार्यवाहक घनश्याम दरणे यांनी सांगितले.
सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर संमेलनाचे आयोजक आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्यात जुंपली आहे. निमंत्रण रद्द करण्याचे पत्र खुद्द जोशी यांनीच लिहिले असून आयोजकांना त्यावर सही करण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप आयोजक समितीचे सदस्य पद्माकर मलकापुरे यांनी केला. ही कृती महामंडळाच्या निर्देशांनुसार केल्याचा अपप्रचार सोयीस्करपणे कोणीही करत असेल, महामंडळाच्या पातळीवर खुलासा करण्याचे कारण नाही. ते म्हणणे खोटे आहे, असे जोशी यांनी म्हटले. आयोजक आणि महामंडळाच्या या कृतीचा निषेध करायलाच हवा. मात्र, संमेलनावर बहिष्कार टाकणे योग्य नाही, अशी भूमिका साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी घेतली आहे.
संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंच्या भूमिकेकडे लक्ष
नयनतारा सहगल यांच्याबाबत घडलेल्या अवमानजनक प्रकाराबाबत संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आपल्या भाषणात नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. डॉ. ढेरे यांनी संमेलनाला जाऊ नये, इथपासून ते त्यांनी आयोजक व साहित्य महामंडळाचा खरपूस समाचार घ्यावा, अशा सूचनावजा प्रतिक्रिया साहित्यवर्तुळात उमटत आहेत.