उमरखेड, महागावात तेल व नैसर्गिक वायूचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:06 AM2017-11-03T01:06:35+5:302017-11-03T01:06:46+5:30
वनसंपदेने नटलेल्या उमरखेड व महागाव तालुक्यात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे पथक दाखल झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड/महागाव : वनसंपदेने नटलेल्या उमरखेड व महागाव तालुक्यात तेल आणि नैसर्गिक वायूचा शोध घेण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे पथक दाखल झाले आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यातील तालुक्यात अल्फा जिओ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून उत्खनन करण्यात येत आहे.
उमरखेड आणि महागाव हे तालुके पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. पैनगंगा अभयारण्य आहे. आता या तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा असल्याचे संशोधन सॅटेलाईटद्वारे करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठीच दहा दिवसांपासून उमरखेड व महागाव तालुक्यातील अनेक गावांत उत्खनन सुरू आहे. आंध्र प्रदेश, तामीळनाडू येथील बोअरवेल मशीनद्वारे उत्खनन केले जात आहे. ड्रिलिंग मशीनद्वारे भूगर्भात शोध घेतला जात आहे. अल्फा जिओ इंडिया लिमिटेड हैद्राबाद यांच्यामार्फत हे काम सुरू आहे.
नंदाळा, पांगरा, हातला, नागापूर, दिवट पिंपरी, पळशी, मरसूळ, कुपटी, सुकळी, चिल्ली, अमानपूर, दिंडाळा या गावात ही मोहीम राबविली जात आहे. तसेच ढाणकी, निंगनूर या गावातही शोध घेतला जात आहे. महागाव तालुक्यातील मुडाणासह इतर गावात नैसर्गिक वायू आणि तेलाचा शोध सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्खननाने दोन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.