पत्नीच्या शोधात मुंबईहून पती यवतमाळात

By admin | Published: August 15, 2016 01:23 AM2016-08-15T01:23:47+5:302016-08-15T01:23:47+5:30

तिची फेसबुकवरुन एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सुखाचा संसार सोडून

In search of wife, husband from Mumbai, in Yavatmal | पत्नीच्या शोधात मुंबईहून पती यवतमाळात

पत्नीच्या शोधात मुंबईहून पती यवतमाळात

Next

दीड वर्षाचा चिमुकलाही सोबत : फेसबुकवरील मैत्रीतून पत्नीला तरुणाने पळवून आणल्याचा संशय
यवतमाळ : तिची फेसबुकवरुन एका तरुणाशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. सुखाचा संसार सोडून आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासह ती त्या तरुणासोबत मुंबईतून बेपत्ता झाली. पती तिचा गावोगाव शोध घेत आहे. दरम्यान दोघेही यवतमाळात असल्याची खात्री पटली. साळ्यासह तो यवतमाळात दाखल झाला. रविवारी सायंकाळपर्यंत वडगाव रोड पोलिसांच्या मदतीने आपल्या ‘बेपत्ता’ पत्नीचा शोध घेत होता.
अवघ्या तीन वर्षापूर्वी प्रियंका (काल्पनिक नाव) हिचा बंडू (काल्पनिक नाव) सोबत विवाह झाला. एका खासगी कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या बंडू आणि प्रियंकाचा सुखाचा संसार सुरू होता. या दाम्पत्याला दीड वर्षापूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले. अशातच प्रियंकाची फेसबुकवरून लखन नामक तरुणाशी ओळख झाली. ३ आॅगस्ट रोजी प्रियंका घरुन दीड वर्षाच्या मुलासह बेपत्ता झाली. बंडूला हा प्रकार कळताच धक्का बसला. नातेवाईकांकडे शोध घेतला, थांगपत्ता लागत नव्हता शेवटी कल्याण पश्चिमच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा प्रियंका कल्याणच्या रेल्वे स्थानकावरून एका युवकासोबत निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले.
पत्नी अशी कुणासोबत गेली याची माहिती मिळताच बंडूच्या पायाखालची वाळू सरकली. मुलाच्या आशेने तो प्रियंकाचा शोध घेत आहे. दरम्यान यवतमाळात तिचे ‘लोकेशन’ पोलिसांना आढळून आले. महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार शेख यांच्यासह तो यवतमाळात रविवारी सकाळी ९ वाजता दाखल झाला. थेट वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. आपली आपबिती त्याने कथन केली. प्रियंकाचा यवतमाळात शोध सुरू झाला. तेव्हा दत्त चौक परिसरात तिचे लोकेशन आढळून येत होते. मात्र सायंकाळपर्यंत प्रियंका आणि लखनचा थांगपत्ता लागला नव्हता.
फेसबुकवरच्या मैत्रीतून एखादी विवाहिता असा टोकाचा निर्णय घेईल आणि सुखाचा संसार उद्ध्वस्त करेल हे यवतमाळ पोलिसांनाही खरे वाटत नव्हते. परंतु पती आणि प्रियंकाचा भाऊच हा प्रकार सांगत होता तेव्हा सर्वांचेच डोळे विस्फरले. (कार्यालय प्रतिनिधी)

१४ तोळे सोने आणि ६० हजार रोख
प्रियंका कल्याणमधून बेपत्ता झाली. त्यावेळी तिच्यासोबत १४ तोळे सोने आणि ६० हजार रुपये रोख असल्याची माहिती बंडूने यवतमाळ पोलिसांना दिली. हा तरुण यवतमाळातील असावा, असाही कयास त्याने व्यक्त केला. पत्नीच्या शोधात बंडू दिवसभर यवतमाळ पालथे घालत होता.

 

Web Title: In search of wife, husband from Mumbai, in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.