वाघाचा दरीमध्ये शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:24 PM2017-10-24T23:24:38+5:302017-10-24T23:26:05+5:30
वाघ दिसल्याची आरोळी एका शेतकºयाने ठोकली. गुरगुरला अन् दरीत शिरल्याचा दावाही त्याने केला. जीवाची भीती असली तरी एकदाचा छडा लाऊच या जिद्दीने लोकांनी दरी गाठली.
निश्चल गौर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : वाघ दिसल्याची आरोळी एका शेतकºयाने ठोकली. गुरगुरला अन् दरीत शिरल्याचा दावाही त्याने केला. जीवाची भीती असली तरी एकदाचा छडा लाऊच या जिद्दीने लोकांनी दरी गाठली. तीन तास ठिय्या देऊनही वाघ बाहेर आला नाही. सोबतीला असलेल्या वनविभागाच्या पथकालाही आल्यापावली परत जावे लागले. वाघाच्या दहशतीने झोप उडालेल्या प्रधानबोरीत (ता.कळंब) हा प्रकार घडला.
प्रधानबोरी परिसरातील जंगल परिसरात तीन ते चार ठिकाणी दरीसदृश मोठे खड्डे आहेत. त्यात वन्य जीवांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. प्रधानबोरी येथील भोन्या आया टेकाम यांच्या शेतालगतच्या डोंगर पायथ्याशी असलेल्या दरीमध्ये वाघ असल्याची चर्चाही वेगाने गावात पसरली. ही माहिती मिळताच वनविभागाच्या पार्डी बीटचे वनरक्षक जी.व्ही. घाटे, पहूर बीटचे वनरक्षक आर.एन. काटोळे, चौकीदार विश्वास धानोरकर यांनी गावकºयांना सोबत घेऊन दरी गाठली. या ठिकाणापासून जवळच अंतरगाव धरण आहे. तेथे पाणी पिण्यासाठी गुरे येतात. शिवाय लगतच शेती आहे. वाघाने जनावरे ठार मारल्याचीही घटना या भागात घडल्या आहे. ज्या ठिकाणी वाघ दिसल्याचे सांगितले जाते, त्या दरीची पाहणीही करण्यात आली. बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतरही असा कुठलाही प्रकार त्याठिकाणी आढळला नाही.
घटनास्थळाचा पंचनामा करून वनविभागाच्या चमूने माहिती घेतली. दरीमध्ये वन्य श्वापद आहे असे काही लोकांकडून ठामपणे सांगितले जात होते. परंतु वनविभागाच्या चमूला काहीही सापडले नाही.