जिल्ह्यात ९९ हजार मतदारांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:18 AM2017-07-25T01:18:10+5:302017-07-25T01:18:10+5:30
निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये एकट्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जवळपास ४५ हजार तर जिल्ह्यात ९९ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही, ...
अद्यावतीकरण : अन्यथा नावे गाळली जाणार
सुहास सुपासे । लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये एकट्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात जवळपास ४५ हजार तर जिल्ह्यात ९९ हजार मतदारांचे छायाचित्रच नाही, अशा सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन अशा मतदारांचा शोध जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. त्यानंतरही जे मतदार आढळून येणार नाहीत, अशा मतदारांची नावे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान यादीतून वगळण्यात येणार आहे.
३१ जुलैपर्यंत सबंधित मतदारांनी आपल्या तहसील कार्यालयात जाऊन रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र द्यावयचे आहे. या कालावधीत जे नागरिक छायाचित्र सादर करणार नाहीत, अशा सर्व नागरिकांची नावे मतदार यादीतूनच काढण्याचे निर्देश आहेत. निवडणूक आयोगाचा सध्या महत्वपूर्ण कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये १ जानेवारी २०१७ रोजी ज्या मुला-मुलींनी वयाची १८ वर्ष पूर्ण केली आहेत, अशा सर्व पात्र भारतीय नागरिकाची मतदार यादीत नोंद झाली पाहिजे आणि नोंद झालेल्या सर्व मतदारांनी मतदान केलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात जाऊन युवा वर्गाला मतदार यादीत नोंदणी आणि मतदान या राष्ट्रीय कार्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
दुसरे असे की, मतदार याद्यांचे बीएलओ मार्फत तपासणी करून ज्यांचे फोटोच मतदार यादीत नाहीत, अशा हजारो लोकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊनही बीएलओ या नागरिकांचा शोध घेत असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच अशा मतदारांनी स्वत: ३१ जुलै २०१७ पर्यंत आपला रंगीत छायाचित्र सबंधित तहसील कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे. यातून बोगस मतदार आपोआप वगळले जाणार आहेत. त्यामुळे जागरुक नागरिकांनी आपले छायाचित्र तहसील कार्यालयात ३१ जुलैपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. इतर सर्व मतदारांसाठी तहसील कार्यालयात यादी उपलब्ध आहे. नागरिक या ठिकाणी आपले नाव आणि छायाचित्र तपासू शकतील. जवळपास एक लाख मतदार असे आहेत ज्यांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा सर्व मतदारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येते. यातूनच बोगस मतदारांवरही आळा बसेल.
ज्या मतदारांचे छायाचित्रच मतदार यादीत नाहीत, अशा मतदारांना सबंधित तहसीलदारांकडून नोटीस पाठविण्यात आल्या आहेत तसेच घरोघरी जाऊन त्यांचा शोध घेणे सुरू आहे. त्यानंतरही जे मतदार आढळून येणार नाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
- संदीप महाजन
उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग