हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद
By admin | Published: April 13, 2016 02:50 AM2016-04-13T02:50:43+5:302016-04-13T02:50:43+5:30
स्थलांतरित पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले आहे.
निधीचा पत्ता नाही : मुख्याध्यापक अडकले आर्थिक कोंडीत
पुसद/दिग्रस : स्थलांतरित पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले हंगामी वसतिगृह मुदतीपूर्वीच बंद करण्यात आले आहे. पाच महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांसह मुख्याध्यापक आर्थिक कोंडीत सापडले आहे. तर उधारी वसुलीसाठी दुकानदार मुख्याध्यापकांकडे चकरा मारीत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस यासह बहुतांश तालुक्यातून मजुरांचे स्थलांतरण होत असते. ऊस कामगार आणि इतरही मजूर कामासाठी स्थलांतरित होतात. अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हंगामी वसतिगृह सुरू केले जाते. कामगारांच्या मुलांसाठी भोजन व निवासाची व्यवस्था येथे असते. पुसद व उमरखेड उपविभागात २० हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. त्यात पुसद तालुक्यातील जवळी, भंडारी, धनसिंगनगर, बान्सी, उमरखेड तालुक्यात गगणमाळ, मोहदरी, धनज, पिंपळदरी, नागापूर, चुरमुरा, चिखली वन, घमापूर, महागाव तालुक्यात कातरवाडी, गुंज, फुलसिंगनगर, माळकिन्ही तांडा, करंजी आणि दिग्रस तालुक्यात धानोरा खुर्द, साखरा, मांडवा असे वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.
सदर वसतिगृह चालविण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकावर देण्यात येते. यासाठी लागणारा निधी सर्वशिक्षा अभियानातून दिला जातो. परंतु पाच महिन्यांपासून अद्यापही निधी मिळाला नाही. त्यामुळे मुदतीपूर्वीच वसतिगृह बंद करावे लागले. या विद्यार्थ्यांना सकाळी नास्ता, जेवण, लेखन साहित्य व इतर साहित्य शासनाकडून देण्यात येते. मात्र पाच महिने झाले तरी अद्याप निधीच मिळाला नाही. मात्र या कालावधीत एक हजार सहा विद्यार्थ्यांवर झालेला खर्च उधारीवर करावा लागला आता दुकानदार मुख्याध्यापकांकडे वसुलीसाठी तगादा लावत आहे. अनेक ठिकाणी मुख्याध्यापक वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. एप्रिलचा दुसरा आठवडा आला तरी अद्याप निधी मात्र उपलब्ध झाला नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)