साडेबाराशे क्विंटल साखर घोटाळयावर शिक्कामोर्तब
By admin | Published: July 3, 2014 11:47 PM2014-07-03T23:47:46+5:302014-07-03T23:47:46+5:30
यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते.
यवतमाळ : यवतमाळ तालुक्यात झालेला साखर घोटाळा चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ३ जुलैला अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी जिल्हा दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांना तहसीलदार अनुप खांडे यांनी या घोटाळ्याचा सुक्ष्म चौकशी अहवाल त्यांच्या सुपूर्द क ेला. त्यामध्ये २०१० ते ११ या वर्षात साखर पुरवठादाराने तब्बल साडेबाराशे क्विंटल साखरेचा अपहार केल्याचे म्हटले आहे.
यवतमाळ तालुक्यातील रास्त भाव दुकानांना एका खासगी पुरवठादारामार्फत साखर पुरविली जाते. २०१० ते २०११ या आर्थिक वर्षात साखर पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी आणि अमरावती विभागीय आयुक्तांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची यवतमाळ तहसीलदारांमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीचा आढावा घेण्यासाठी आज अमरावती विभागीय पुरवठा उपायुक्त माधवराव चिमाजी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांच्याकडून साखर घोटाळ्याची माहिती आणि चौकशीची स्थिती जाणून घेतली. त्यानंतर उपायुक्त चिमाजी हे येथील तहसील कार्यालयात धडकले. त्यांनी या वेळी तहसीलदार अनुप खांडे यांच्याकडून आतापर्यंत केलेल्या चौकशीचा आढावा घेतला. त्यानंतर तहसीलदार खांडे यांनी उपायुक्त चिमाजी यांच्याकडे चौकशीचा अहवालच सादर केला.
त्यामध्ये २०१० ते २०११ या आर्थिक वर्षात यवतमाळ तालुक्यात तब्बल एक हजार २५० क्विंटल साखरेचा घोटाळा झाला असल्याचे नमूद केले आहे. तसेच या अहवालाची एक प्रत जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले.
या अहवालातील घोटाळ्याचे बारकावे तपासून लवकरच संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी उपायुक्त चिमाजी यांनी तक्रारकर्त्यांना दिल्याचेही तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे साखर पुरवठादार चांगलाच अडचणीत येण्याचे संकेत निर्माण झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)