‘एएसआय’च्या जागा रिक्त, जमादारांना बढतीची प्रतीक्षा
By Admin | Published: July 21, 2016 12:07 AM2016-07-21T00:07:15+5:302016-07-21T00:07:15+5:30
जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदारांच्या तीन डझनावर जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही जमादारांना पदोन्नती दिली जात नसल्याची ओरड आहे.
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदारांच्या तीन डझनावर जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही जमादारांना पदोन्नती दिली जात नसल्याची ओरड आहे. ही पदोन्नती रखडण्यामागे लिपिकवर्गीय यंत्रणेचा कारभार जबाबदार असल्याचे सांगितले जाते.
सहायक फौजदाराची जागा रिक्त झाल्यास लगेच ती प्रतीक्षा यादीतील जमादाराला पदोन्नती देऊन भरली जावे, असे शासनाचे स्थायी आदेश आहेत. त्यानुसार एक जागा रिक्त झाली तरी लगेच ती भरली जाते. परंतु यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सहायक फौजदारांच्या कित्येक जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही त्या भरल्या जात नसल्याची ओरड आहे. वास्तविक सेवाज्येष्ठतेनुसार जमादारांना बढती देऊन एएसआयच्या या जागा भरणे बंधनकारक आहे. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. या बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जमादार सेवानिवृत्त होत आहेत. काहींची सेवानिवृत्ती अगदी तोंडावर आहे. एएसआय झाल्यास सेवानिवृत्तीनंतर त्या पदानुसार आर्थिक लाभ मिळत असल्याने जमादारांचा या चार-सहा महिन्यांसाठी का होईना पदोन्नतीसाठी जोर आहे. मात्र लिपिकवर्गीय यंत्रणा आपल्या निष्क्रीय कारभारामुळे अप्रत्यक्ष त्यात आडकाठी निर्माण करीत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आणि कार्यालय अधीक्षकांनी याबाबीकडे जातीने लक्ष देऊन जमादारांना न्याय द्यावा, अशी पोलीस वर्तुळातील मागणी आहे. २८ ते ३० वर्ष सेवा होऊनही जमादारांना सहायक फौजदारपदी बढतीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने खरी नाराजी आहे. (प्रतिनिधी)