महिलांच्या नावे होणार आता सातबारा
By Admin | Published: July 31, 2016 01:18 AM2016-07-31T01:18:44+5:302016-07-31T01:18:44+5:30
महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
महसूल आठवडा : अंमलबजावणी महाराजस्व अभियानाची, महिलांचा होणार सत्कार
यवतमाळ : महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. खासकरून शेतीचा सातबारा महिलांच्या नावावर करण्याचे काम या सप्ताहात पार पाडले जाणार आहे. ‘सातबारा ज्यांच्या नावे त्या भगिनींसाठी शासन धावे’, ‘अथवा ताई मावशी अक्का, आता जग जिंका’ अशी महसूल आठवड्याची टॅग लाईन आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच महसूल दिनाची शपथ कर्मचाऱ्यांकडून घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
महिलांच्या सबलीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याची अंमलबजावणी महसूल सप्ताहापासून करण्यात येणार आहे. साधारणत: सातबारावर महिलांचे नाव नोंदविले जात नाही. या मोहिमेतून सातबारा आणि आठ ‘अ’ मध्ये महिला कुटुंब प्रमुखाचे नाव राहणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महसूल विभागाशी निगडित प्रश्नासोबतच कृषी, सहकार, बालकल्याण, विभागाच्या योजनांची माहितीही महिलांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावपातळीवर मेळावे आणि मोहिमेद्वारा महिला खातेदारांसाठी माहिती सल्ला आणि प्रोत्साहन देण्याचे उपक्रम राबविले जाणार आहे. गावागावात महिलांच्या नावाने असलेल्या सातबारांचे वाचन करण्यात येणार आहे.
जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी पूर्वी शेतकऱ्यांच्या मुलांना पैसे लागायचे. आता बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून दोन लाख रुपये भरण्यात आले. हे दाखले शेतकऱ्यांच्या पाल्याना मोफत मिळणार आहे. उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा प्रशासनामार्फत सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महसूल उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, एनआयसी प्रमुख उमेश घुगुसकर, बळीराजा चेतना अभियानाच्या ज्युनिअर प्रोग्रामर सोनल झोळ आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)