वाघाचा दुसरा बछडाही आता ‘रेडिओ कॉलर’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:33 PM2019-02-27T23:33:34+5:302019-02-27T23:35:22+5:30
पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते.
पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थलांतरणाचा अभ्यास केला जात आहे. या संशोधन प्रकल्पांतर्गत पांढरकवडा वन्य जीव विभागातील टिपेशवर अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या वाघाच्या दोन बछड्यांना रेडिओ कॉलर लावण्याचे नियोजन होते. पहिल्या बछड्याला २५ फेब्रुवारीला हा कॉलर लावण्यात आला. तर दुसऱ्या बछड्याला बुधवारी कक्ष क्र. १०९ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडूनचे डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब व पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांनी बेशुद्ध करून रेडिओ कॉलर लावला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिभास क्षेत्रात मुक्त करण्यात आले. या कामी पांढरकवडाचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) प्रमोद पंचभाई, सहायक वनसंरक्षक संदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम आदींनी परिश्रम घेतले. टिपेश्वर अभयारण्यातील या दोन छाव्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील वाघांच्या हालचालींवर सनियंत्रण करण्यास वन्यजीव विभागाला मोठी मदत मिळणार आहे. सद्यस्थितीत ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघ तेलंगाणाच्या कावल व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर करीत आहे. तेथून ते टिपेश्वर अभयारण्य व पुढे अन्य वनक्षेत्रात या वाघांचा वावर वाढतो.