माफीची दुसरी यादी घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:39 PM2017-11-22T23:39:11+5:302017-11-22T23:40:02+5:30
रूपेश उत्तरवार।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : कर्जमाफीची घोषणा होऊन महिना लोटला. आता दुसरी यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही जमा झाला नाही. या दोन्ही आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी एकूण तीन लाख ४० हजार अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरले होते. त्यापैकी दोन लाख ४० हजार शेतकऱ्यांना दोन हजार कोटींची कर्जमाफी मिळणार आहे. उर्वरित एक लाख अर्ज छाननीत बाद झाले. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी शेकडो यातना सहन केल्या. मात्र अर्ज पात्र ठरूनही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा छदामही जमा झाला नाही. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.
गेल्या १८ आॅक्टोबरला नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. प्रातिनिधीक स्वरूपात जिल्ह्यातील ३१ शेतकºयांना त्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले गेले. त्यांचे कर्ज ‘निल’ झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या ३१ शेतकºयांच्या खात्यातही पैसे जमा झाले नाही. नंतर २३९७ शेतकºयांची पहिली ग्रीन यादी आली. त्यासाठी १४ कोटी ३० लाख बँकेकडे वळते करण्यात आले. मात्र सहकार विभागाने ग्रीन यादीचीच फेर चौकशी सुरू केली. ती अद्याप संपली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेच आले नाही.
पहिल्याच यादीचा घोळ सुरू असताना बुधवारी शासनाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एक हजार शेतकºयांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र ही यादीही सदोष आहे. त्यामुळे आता या यादीतील नावांची फेरतपासणी सुरू करण्यात आली आहे.
या यादीत शेतकºयांकडे नेमके किती कर्ज आहे, याची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. आता पहिली आणि दुसरी यादी चौकशीतच आहे. दोन्ही याद्या चोफकशीच्या फेºयात सापडल्याने शेतकºयांच्या खात्यात पैसे कधी जमा होतील, याबाबत साशंकता वाढली आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांची तर यादीच नाही
जिल्हा बँकेच्या दोन याद्या प्रसिद्ध झाल्या. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांच्या याद्या अद्यापही प्रसिद्ध झाल्या नाही. ग्रामीण बँकेच्या याद्याही लागल्या नाही. यामुळे शेतकरी गोंधळाच्या स्थितीत सापडले आहे.
जिल्हा बँकेची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. त्याची शहानिशा सुरू आहे. पहिल्या यादीची चौकशी अपूर्ण आहे. चौकशीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल.
- अरविंद देशपांडे
सीईओ, जिल्हा सहकारी बँक, यवतमाळ