दुसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या
By Admin | Published: February 20, 2017 01:22 AM2017-02-20T01:22:15+5:302017-02-20T01:22:15+5:30
दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि १२ गणांच्या प्रचाराचा धुरळा रविवारी रात्री शांत झाला.
मंगळवारी मतदान : आता केवळ छुपा प्रचार, ६ गट आणि १२ गण
यवतमाळ : दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या सहा गट आणि १२ गणांच्या प्रचाराचा धुरळा रविवारी रात्री शांत झाला. आता उमेदवार व कार्यकर्त्यांना जोर छुप्या प्रचारावर राहणार आहे.
गटांच्या आरक्षणावरून प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे सहा गट व त्याअंतर्गत येणाऱ्या १२ गणांची निवडणूक लांबणीवर पडली होती. नवीन आरक्षणानंतर या गट व गणांसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार रविवारी रात्री १० वाजता समाप्त झाला. आता सर्व उमेदवार व कार्यकर्ते रविवार व सोमवारच्या रात्री छुप्या प्रचारावर जोर देणार आहे. या दोन रात्रीतून त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.
या टप्प्यात कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव आणि विडूळ-चातारी या गटात मतदान घेतले जाणार आहे. त्यापैकी देऊरवाडी-सुकळी गटात सहा, तर दोन गणात १२, लाडखेड-वडगाव गटात सहा व दोन गणात १२, वटफळी-अडगाव गटात पाच, तर दोन गणात १३, विडूळ-चातारी गटात चार, तर दोन गणात सात, घोन्सा-कायर गटात सात, तर दोन गणात १० आणि कुंभा-मार्डी गटात एका जागेसाठी सहा, तर पंचायत समितींच्या दोन जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही टप्प्यातील मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
निकालाची उत्सुकता शिगेला
पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. उमेदवार आणि नेते विजयाचे दावे ठोकत आहे. मात्र मतदार राजा आपले कर्तव्य जावून तूर्तास चुप्पी साधून आहे. त्यांनी कुणाला कौल दिला, हे २३ फेब्रुवारीलाच कळणार आहे.