मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा तीन हजार कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 04:30 PM2020-10-09T16:30:16+5:302020-10-09T16:32:47+5:30
Mukhyamantri Gram Sadak Yojana Yawatmal News मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे. हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संकटामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यामुळे विकास कामांवर खर्चासाठी तेवढा पैसा उपलब्ध होत नाही. त्यावर पर्याय म्हणून आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास कामे केली जाणार आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे.
एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे केली जातात. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे जून २०१९ मध्ये मंजूर केली गेली होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी २०१८-१९ च्या दरसूचीनुसार या कामांना प्रशासकीय मान्यताही दिली गेली. योजनेचे पुणे येथील मुख्य अभियंता यांनी २८ सप्टेंबर रोजी या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये चालू दरसूचीवर आधारित तांत्रिक मान्यता देवून ही निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातून इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व त्यावरील पुलांचे बांधकाम केले जाणार आहे.
अमरावती विभागात ४०० किलोमीटरचे रस्ते
त्यात एकट्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात सुमारे ४०० किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. दीड वर्षांपासून या मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर ती प्राप्त झाल्याने संबंधित अभियंते व कंत्राटदारांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाकडे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला टप्पाही सुमारे तीन हजार कोटींचा होता. त्या टप्प्यातील अनेक कामे अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाकडे आहेत. लवकरच ती पूर्णही होणार आहेत. या योजनेची निविदा प्रक्रिया लवकरच जिल्हास्तरावरून राबविली जाणार आहे.