यवतमाळात अतिक्रमण हटावचा दुसरा टप्पा
By admin | Published: February 5, 2017 12:51 AM2017-02-05T00:51:51+5:302017-02-05T00:51:51+5:30
नगरपरिषदेने शनिवारी अतिक्रमणाचा दुसरा टप्पा राबविण्यास सुरूवात केली. यात आठवडीबाजार परिसरातील तब्बल १५ अतिक्रमणे हटविण्यात आली.
नगरपरिषदेची मोहीम : शहरातील १८३ धार्मिकस्थळे काढणार
यवतमाळ : नगरपरिषदेने शनिवारी अतिक्रमणाचा दुसरा टप्पा राबविण्यास सुरूवात केली. यात आठवडीबाजार परिसरातील तब्बल १५ अतिक्रमणे हटविण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील २००९ पूर्वीचे अतिक्रमित आणि २००९ नंतरची धार्मिकस्थळे, अशी विभागणी करण्यात आली. ही सर्व धार्मिकस्थळे निष्कासीत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २६ धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. सहा धार्मिकस्थळांचे अतिक्रमण स्वत:हूनच नागरिकांनी काढले. मोहिमेपूर्वीच पालिकेकडून नऊ धार्मिकस्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले. आत्तापर्यंत ३४ धार्मिकस्थळे हटविण्यात आली आहे. धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा ७ फेब्रुवारीपासून राबवली जाणार आहे.
याशिवाय दारव्हा मार्गावरील झोपडपट्टीतील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. सध्या पदवीधर व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडण्णूक बंदोबस्त असल्याने पोलीस प्रशासनाकडून होकार मिळताच, अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. दारव्हा मार्गाच्या अतिक्रमणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही मदत मागण्यात आली. लवकरच याबाबत संयुक्त बैठक घेवून अतिक्रमण मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)