पिंपळखुटी चेकपोस्टवर सुरक्षा रक्षक शिरजोर

By admin | Published: May 4, 2017 12:12 AM2017-05-04T00:12:48+5:302017-05-04T00:12:48+5:30

विदर्भ-तेलंगणाच्या सीमेवरील पिंपळखुटी आरटीओ चेक पोस्टवर कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या दंडेलशाहीमुळे वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहे.

Security checker at Pimple check post | पिंपळखुटी चेकपोस्टवर सुरक्षा रक्षक शिरजोर

पिंपळखुटी चेकपोस्टवर सुरक्षा रक्षक शिरजोर

Next

आरटीओ आणि यंत्रणा हतबल : वाहन चालकांना मारहाण, अधिकाऱ्यांपेक्षा रक्षकांचीच दहशत
यवतमाळ : विदर्भ-तेलंगणाच्या सीमेवरील पिंपळखुटी आरटीओ चेक पोस्टवर कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या दंडेलशाहीमुळे वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहे. वाहनधारकांना उठसूट मारायला उठणारे सुरक्षा रक्षक आरटीओ अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सुरक्षा रक्षक लगतच्या परिसरातीलच असल्याने ते सर्वांवर शिरजोर झाले असून त्यांना काही राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर पिंपळखुटी येथे परिवहन विभागाचे चेक पोस्ट आहे. अहोरात्र वाहतूक होणाऱ्या या रस्त्यावर येथे प्रत्येक वाहनांची तपासणी होते. हे काम परिवहन विभागाने सद्भावना या संस्थेकडे सोपविले आहे. त्यांनी परस्परच दुसऱ्या संस्थेला कंत्राट दिल्याची माहिती आहे. येथे कंत्राटी तत्वावर परिसरातील दांडग्या तरुणांना अत्यल्प मानधनावर कामावर ठेवले आहे. तीन पाळीत चालणाऱ्या या कामावर एका पाळीत २८ जणांची नियुक्ती असते. येथे कर्तव्यावर असलेल्या मोटर वाहन निरीक्षकांना सहाय्य करणे एवढेच काम असते. शक्यता असल्यास संशयित वाहनांच्या झडतीस मदत करणे, संशयित ओव्हर लोड वाहनांचे वजन करणे अशी कामे अपेक्षित आहे. मात्र या सुरक्षा रक्षकांनी चेक पोस्टवरची संपूर्ण यंत्रणाच स्वत:च्या ताब्यात घेतली आहे. मनमानी पद्धतीने येथील कामकाज सुरू आहे. जबरदस्तीने वाहने थांबवून चालकांना दमदाटी केली जाते. अनाठायी पैशाची मागणी होते. कारण नसताना वाहने थांबवून ठेवली जातात. याबाबत एखाद्या चालकाने अथवा मोटर मालकाने जाब विचारला तर त्याला थेट मारहाण केली जाते. हे सर्व सुरक्षा रक्षक स्थानिक असल्याने त्यांच्या विरोधात जाण्याची कुणाचीच हिंमत नाही. आरटीओतील अधिकारीसुद्धा त्यांच्या दहशतीत आहेत. येथील काही अधिकाऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी विभागीय परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली होती. दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बदली झाल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात पडले.
चेक पोस्टवरील कंत्राटी सुरक्षा रक्षकांनी चार महिन्यांपूर्वी एका राज्यमंत्र्यांच्या भावाला मारहाण केली. मात्र राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने या घटनेची तक्रार झाली नाही. तेव्हापासून तेथील सुरक्षा रक्षक निर्ढावले. आठ दिवसापूर्वी अमरावती येथील वाहतूक व्यावसायिक महेश प्रकाश पुरोहित यांना घेराव घालून सुरक्षा रक्षक व तेथील काट्यावरच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार दिल्यास चेक पोस्टवरून एकही वाहन तेलंगणात जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. मात्र पुरोहित यांनी या धमकीला भीक न घालता पांढरकवडा पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. त्यानंतरही या प्रकरणात पोलिसांकडून ठोस अशी कारवाई करण्यात आली नाही. सुरक्षा रक्षक व काट्यावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे टोळके चेक पोस्ट परिसरातील कायदा व सुव्यवस्था सातत्याने धोक्यात आणत आहे. तेथे एखाद्या वाहन चालकाचा अथवा वाहन मालकाचा जीव जाण्याची स्फोटत परिस्थिती निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

सीसीटीव्ही कॅमेरे फिरविले जातात तस्करांच्या सोयीने
चेक पोस्टवर सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. याचे नियंत्रण थेट मुंबईतील ट्रान्सपोर्ट कमिश्नर कार्यालयातून होते. मात्र चेक पोस्टवरचे सीसीटीव्ही कॅमेरे सोईसाठी दुसऱ्याच दिशेला फिरविले जातात. मोठी रक्कम घेऊन अनेक प्रकारची तस्करी करणारी वाहने राजरोसपणे सोडली जातात. यावर कुणाचे नियंत्रण नाही. चार ते पाच हजार रुपये मानधनात येथील सुरक्षा रक्षक व इतर कंत्राटी कर्मचारी पूर्णवेळ सेवा देतात. मोठी उलाढाल होत असल्याने त्यांनी चेक पोस्टवर अनधिकृत ताबा प्रस्थापित केला असून राज्याबाहेर होणाऱ्या तस्करीची पाळेमुळे येथे रुजली आहे.

 

Web Title: Security checker at Pimple check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.