एटीएममध्ये सुरक्षा रक्षक होता भरदिवसा झोपलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 09:31 PM2017-12-21T21:31:15+5:302017-12-21T21:32:19+5:30

The security guard at the ATM was sleeping all day long | एटीएममध्ये सुरक्षा रक्षक होता भरदिवसा झोपलेला

एटीएममध्ये सुरक्षा रक्षक होता भरदिवसा झोपलेला

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा मुख्यालयीच सुरक्षा धोक्यात : ग्रामीणची अवस्था काय ?

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाभरात विविध बँकांचे दोनशे एटीएम आहेत. या एटीएमची जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळात स्थिती तपासली असता धक्कादायक चित्र पुढे आले. मुख्यालयाची ही स्थिती असेल तर तालुका व ग्रामीण भागातील एटीएमची काय अवस्था असेल याचा अंदाज आला. सेंट्रल बँकेच्या मार्इंदे चौकातील एटीएमचा सुरक्षा रक्षक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता आत झोपलेल्या स्थितीत आढळला. आर्णी रोडवर अभ्यंकर कन्या शाळेच्या गल्लीतील आयडीबीआयच्या एटीएमवर सुरक्षा रक्षक नव्हता, तेथे केरकचराही मोठ्या प्रमाणात आढळला. टांगा चौकातील कॉसमॉस बँकेच्या एटीएमवर तर चक्क खुर्ची ठेवलेली आढळून आली. गार्डचा तेथे पत्ताच नव्हता. दत्त चौकातील एक्सीस बँक, सारस्वत चौकातील एचडीएफसी बँक, दर्डानगरातील आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया, दारव्हा रोडवरील पंजाब नॅशनल या ठिकाणी सुरक्षा रक्षक दृष्टीस पडला नाही. पीएनबीच्या एटीएममध्ये तर लावलेले योजनांचे फलक कुणी तरी काढून नेले.
प्रत्येक एटीएममध्ये दर दोन दिवसांनी १५ ते २० लाखांची रोकड टाकली जाते. त्याची क्षमता ३० लाखांची आहे. पोलिसांकडून सुरक्षेबाबत वारंवार सूचना केल्या जातात. मात्र एटीएमची जबाबदारी खासगी एजंसीकडे आहे, असे सांगून सर्रास बँका हातवर करताना दिसतात. प्रत्येक वेळी सीसीटीव्ही व अलार्मकडे बोट दाखवून बँका स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याचेही चित्र आहे.
दर्डानगर येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम तर अक्षरश: शोभेची वस्तू ठरले आहे. तेथून कुणी कॅश काढल्याचे ऐकिवात नाही. तेथे सूचना फलकही लागलेला नसतो. या एटीएमच्या नावाने ग्राहक कायमच शिमगा करताना दिसतो. अनेकदा तर या एटीएममध्ये पावसाळ्यात चक्क जनावरे शिरल्याचीही उदाहरणे आहेत. वारंवार सूचना देऊनही बँकाच आपल्या एटीएमबाबत गंभीर नसल्याचे पाहून पोलीसही त्याकडे दुर्लक्ष करतात.
आजच्या घडीला अनेक एटीएम दुर्लक्षित जागी आहेत. तेथे भंडारासारखी घटना घडविणे कठीण नाही. मात्र त्यानंतरही बँका एटीएममधील रोकडच्या सुरक्षेबाबत फारशी काळजी घेत नसल्याचे या पाहणीत आढळून आले.
बँकांचा असाही बचाव
सुरक्षा गार्ड असतात पण ते राहत नाहीत, त्यांच्या तीन शिफ्ट असतात, मात्र पगार वेळेत मिळत नसल्याने ते दिसत नाहीत, बँकेला अटॅच असल्याने गार्डची गरज पडत नाही, असे एटीएम रात्री ८ नंतर बंद केले जातात, एटीएमवर सीसीटीव्ही कॅमेरे, अलार्म सिस्टम लागलेली आहे, असा बचाव बँका घेत आहेत. परंतु प्रत्यक्षात सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारणे, अलार्मचे वायर तोडणे या सारखे प्रकार घडत असल्याने सुरक्षेची ही प्रतिबंधात्मक उपाययोजना फेल ठरते.

Web Title: The security guard at the ATM was sleeping all day long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम