बियाणे बाजारातील उलाढाल ठप्प
By admin | Published: June 11, 2014 12:17 AM2014-06-11T00:17:35+5:302014-06-11T00:17:35+5:30
कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून
केवळ २० टक्के विक्री : लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचना
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
कोट्यवधीची उलाढाल असणारा बियाणे बाजार सध्या ठप्प आहे. लांबलेला पाऊस आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी बियाणे खरेदीसाठी प्रचंड अनुत्सूक आहे. आतापर्यंत केवळ २० टक्केच बियाण्यांची विक्री झाली असून गतवर्षी याच काळात ८० टक्के बियाणे विकले होते. पावसाला प्रारंभ झाल्यानंतर खरेदीसाठी गर्दी वाढण्याची आशा आहे.
गतवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रबी हंगामात गारपिटीत शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला. घेतलेले बँकांचे कर्जही परतफेड करू शकला नाही. परिणामी नवीन कर्ज मिळण्यात अडचण येत आहे. हातात पैसा नाही आणि कर्जही मिळत नाही, अशा विवंचनेत शेतकरी आहे. खरीप हंगामासाठी मशागत करून शेती सज्ज आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. मृग नक्षत्र उलटून तीन दिवस झाले तरी कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे शेतकरी अद्यापही बी-बियाणे खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्र ओस दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात नऊ लाख २०० हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यात कपाशी तीन लाख ८६ हजार हेक्टर, सोयाबीन तीन लाख ८९ हजार हेक्टर, तूर ९० हजार हेक्टरवर पेरा होणार आहे. कृषी केंद्रचालकांनी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बियाण्यांचे बुकींग केले. कपाशी, सोयाबीनच्या बियाण्यांनी कृषी केंद्र हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र खरेदीसाठी शेतकरीच दिसत नाही. यवतमाळच्या मेटीखेडा कृषी केंद्राचे संचालक नितीन सरोदे म्हणाले, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून शेतकरी कृषी केंद्रात दिसत आहे. त्यांना बियाण्यांचे भाव कमी होण्याची आशा आहे. सध्या शेतकरी केवळ खत खरेदी करीत आहे. नेर येथील आदर्श कृषी केंद्राचे संचालक शबीर मकवाणी म्हणाले, शेतकरी बी-बियाण्यांची चाचपणी करीत आहे. पाऊस कोसळल्यानंतर गर्दी वाढेल. वणी येथील अभय कृषी केंद्राचे संचालक अभय कटकमवार म्हणाले, यंदा शेतकऱ्यांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसत नाही. बियाण्यांचे दर कमी होण्याची प्रतीक्षा आहे. तसेच कृषी केंद्र चालकांची उधारीवर माल देण्याची तयारी नाही. त्यामुळे बाजारात गर्दी कमी आहे. यवतमाळ येथील अजय कृषी केंद्राचे संचालक अजय येरावार म्हणाले, प्रत्येक शेतकरी दुकानदाराला बियाण्यांची गॅरंटी मागत आहे. बियाणे सर्टिफाईड असल्याचे प्रमाणपत्र असल्याने आम्ही गॅरंटी घेण्याचा प्रश्नच येत नाही. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.