समूहाने पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे
By admin | Published: February 7, 2017 01:26 AM2017-02-07T01:26:04+5:302017-02-07T01:26:04+5:30
शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत.
महाबीजचा पुढाकार : कृषी विभागाला नवीन गावात परमिट देण्याचे आदेश
यवतमाळ : शेतकऱ्यांना अनुदानावर मोठ्या प्रमाणात बियाणे मिळावे म्हणून महाबीज कंपनीने पावले उचलली आहेत. याकरिता कृषी विभागाला नवीन गावात भुईमूग बियाण्याचे परमिट देण्याचे आदेश देण्यात आले आहे. यासाठी ५० ते १०० शेतकऱ्यांना समूहात कृषी विभागाकडे मागणी नोंदवावी लागणार आहे. त्यादृष्टीने आणखी काही बियाणे महाबीज कंपनी जिल्ह्याकडे वळते करणार आहे.
भुईमुगाच्या पेरणीकरिता जिल्ह्याकडे सहा हजार क्विंटल बियाणे वळते झाले. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांचो वाटप झाले तर, बाराशे क्विंटल बियाणे शिल्लक आहेत. परमिट उचलणाऱ्या काही शेतकऱ्यानी अद्यापही बियाणे उचलले नाही. त्यांना बुधवारपर्यंत संधी देण्यात आली आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात ज्या प्रमाणात बियाण्यांची मागणी आहे, त्यानुसार उपलब्ध बियाण्यांचे वाटप झाले असले तरी आवश्यक ते बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांकडून मागणी नोंदविणे आवश्यक आहे. दरम्यान, अनेक गावातून भुईमुगाच्या बियाण्याची मागणी येत आहे. मात्र अशी गावे यादीत नाही. यामुळे अशा गावांचा नव्याने प्रस्ताव स्वीकारला जाणार आहे. याकरिता ५० ते १०० शेतकऱ्यांनी समूहाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्यांच्या योजनेत नाव नोंदविण्याची मागणी करायची आहे. तत्काळ या शेतकऱ्यांना परमिट दिले जाणार आहे. एका शेतकऱ्याला दोन बियाण्याच्या बॅग अनुदानावर दिल्या जाणार आहे. यामुळे आर्थिक अडचणित सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार परमिटांचे वितरण करण्यात आले आहे. यातील पाच हजार क्विंटल बियाण्यांची उचल शेतकऱ्यांनी केली आहे. तर एक हजार क्विंटल बियाण्यांचे परमिट शेतकऱ्यांनंी अद्यापही कृषी सेवा केंद्रांकडे सादर केले नसल्याची माहिती आहे. असे परमिट रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहे. (शहर वार्ताहर)
महाबीज घेणार दखल
महाबीज कंपनी अनुदानावर बियाणे देत आहे. मात्र तालुका कृषी कार्यालयातून अनेक गावांना परमिट आधीच वाटले असे सांगत परत केले जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाबीज कंपनीने अशा प्रकरणात नव्याने बियाणे जिल्ह्याकडे वळते करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही नव्याने परमिट न मिळाल्यास महाबीजकडे तक्रार करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप देशमुख यांनी केले आहे.