पित्याच्या पाठीवरील ओझे पाहिले अन् तिने बनविले पोती उचलणारे यंत्र
By अविनाश साबापुरे | Published: July 16, 2023 07:44 PM2023-07-16T19:44:57+5:302023-07-16T19:45:17+5:30
मुलगी ओझे नसते... ओझे हलके करीत असते..!
यवतमाळ : मुलगी गरिबाची असो की श्रीमंताची वडिलांसाठी ती ‘पापा की परी’च असते. पण हीच परी अनेकांना ओझे वाटते. तिला परक्याचे धन मानले जाते. पण हीच ‘परी’ आता गुणवत्तेचा परिचय देत पित्याच्या आयुष्याला ‘परिसस्पर्श’ देऊ लागलीय. अशीच एक गुणवान परी आहे समीक्षा राजेंद्र बातुलवार..!
तिने असे काय केले बरे ! इतरांच्या शेतात राबणाऱ्या आपल्या बाबाला ओझे उचलताना पाहून तिचे काळीज द्रवले अन् तिने ते ओझे हलके करणारे यंत्रच बनवून टाकले. या यंत्राने आता केवळ समीक्षाच्या बाबाचेच नव्हेतर कुठल्याही कष्टकरी माणसाचे ओझे हलके होणार आहे. समीक्षा राजेंद्र बातुलवार ही मुलगी राळेगाव तालुक्याच्या पेरका सावंगी गावची रहिवासी. वडील राजेंद्र आणि आई वंदना दोघेही शेतमजुरीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पण मुलगा अभिषेक आणि मुलगी समीक्षा या दोघांनाही खूप शिकवावे ही त्यांची धडपड आहे. पण पुस्तक शिकता-शिकता रोजच्या जीवनातूनही बरेच काही शिकता येते हे समीक्षाने सिद्ध केले.
रोज आपल्या वडीलांना ओझे उचलताना पाहणारी दहाव्या वर्गातील समीक्षा हे ओझे हलके कसे करता येईल याचा विचार करू लागली. त्यातच शाळेत ‘इन्सपायर अवार्ड’ विज्ञान प्रदर्शन स्पर्धेबाबत तिला शिक्षकांनी माहिती दिली. त्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मग तर समीक्षाचा निर्धारच झाला... असे काही तरी यंत्र बनवून या प्रदर्शनात ठेवायचे की, ज्यामुळे आपल्या बाबांचे ओझे हलके होईल. राळेगावच्या नेताजी विद्यालयातील बासेकर, कुबडे या शिक्षकांच्या मार्गदर्शनात तिने प्रयत्न सुरू केला.
सरकारकडून या प्रयोगासाठी ‘इन्सपायर अवार्ड’ योजनेतून १० हजार रुपयांची रक्कम मिळाली. त्यातून साहित्य गोळा करत समीक्षाने यंत्र साकारले. त्याचे नाव ‘धान्य पोत्यात भरणारे आणि पोते वाहून नेणारे यंत्र’. तालुकास्तरीय प्रदर्शनात तिच्या या ‘प्रोजेक्ट’ची निवड झाली अन् जिल्हास्तरीय प्रदर्शनातही निवड झाली. हा प्रयोग पुढे राज्यस्तरावर जाऊ शकला नाही, तरी त्याची उपयोगीता मात्र सर्वांच्या लक्षात आली. समीक्षाच्या या प्रयोगाला सरकारने व्यावसायिक तत्वावर प्रोत्साहन दिल्यास महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील हमालांचे ओझे हलके होणार आहे. आता बाराव्या वर्गात गेलेली समीक्षा अजूनही विज्ञान प्रयोगाचा समाजासाठी वापर व्हावा, अशी इच्छा बाळगून आहे.
बाबांचे कष्ट पाहून हे यंत्र तयार करण्याची कल्पना सूचली. इन्सपायर अवार्डच्या निमित्ताने शिक्षकांनी त्यासाठी मार्गदर्शन केले. हे यंत्र पोत्यात धान्य भरण्यासाठी आणि ते पोते उचलण्यासाठी उपयोगी आहे.- समीक्षा बातुलवार, पेरका सावंगी