काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:58 AM2017-11-06T00:58:35+5:302017-11-06T00:58:53+5:30
काळ्या बाजारात जाणारे शासकीय गहू आणि तांदूळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत एका वाहनातून वडगाव रोड पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : काळ्या बाजारात जाणारे शासकीय गहू आणि तांदूळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत एका वाहनातून वडगाव रोड पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले. ४० पोते गहू आणि पाच पोते तांदुळासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.
येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटी परिसरात एक मालवाहू वाहन धान्य घेऊन उभे असल्याची खबर वडगाव रोड पोलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे यांनी तेथे धाड मारली. त्यावेळी मालवाहू वाहन क्र.एम.एच.२९-टी-४२५० आढळून आले. चालक मनोज छेदीलाल जयस्वाल (३२) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी याला विचारणा केली. तेव्हा त्याने योग्य उत्तरे दिली नाही. त्यावरून धान्यासह वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनात ५० किलो वजनाचे ४० पोते गहू आणि पाच पोते तांदूळ आढळून आले. ४७ हजार ५०० रुपये या धान्याची किंमत आहे. रविवारी पुरवठा निरीक्षक चांदणी शिवरकर यांच्या उपस्थितीत पुन्हा मनोज जयस्वाल यांना विचारणा करण्यात आली. परंतु धान्याबाबत समर्पक पुरावा सादर करू शकले नाही. त्यावरून मनोज जयस्वाल याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.