बोअरवेल खोदताना मशीन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:22 PM2018-03-06T23:22:09+5:302018-03-06T23:22:09+5:30
टंचाई क्षेत्र घोषित यवतमाळ शहरात बंदी असताना बोअरवलचे खोदकाम करताना मंगळवारी मशीनचे दोन ट्रक जप्त करण्यात आले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : टंचाई क्षेत्र घोषित यवतमाळ शहरात बंदी असताना बोअरवलचे खोदकाम करताना मंगळवारी मशीनचे दोन ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई समर्थवाडीतील ‘आरोग्यम हॉस्पिटल’मध्ये उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी पथकासह धाड टाकून केली. ही यवतमाळ शहरातील पहिलीच कारवाई असून यामुळे बोअरवेल खोदणाºयांचे धाबे दणाणले आहे.
दुष्काळी क्षेत्रात भूजल वापराबाबत नियमन करण्यात आले आहेत. पाण्याचा व्यवसायिक वापर पूर्णत: बंद करण्याचे निर्देश आहेत. पाण्याची टंचाई असल्याने भूजल पातळी कायम राहावी यासाठी नवीन बोअरवेल, विहिरी खोदकामावर बंदी आहे. असे असतानासुध्दा येथील ज्योती मंगल कार्यालयासमोरील ‘आरोग्यम हॉस्पिटल’मध्ये बोअरवेल खोदकाम सुरू होते. याची तक्रार भूजल विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीची माहिती उपविभागीय दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांना देण्यात आली. तांगडे यांनी तहसलीदार सचिन शेजाळ यांना घेऊन या ठिकाणी धाड टाकली. भूजल अधिनियमातील कलम २५ नुसार ही मशीन जप्त करण्यात आली. कर्नाटक येथील मशीन असलेले दोन ट्रक तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. भूजल अधिनियमातील तरतुदीनुसार या दोन्ही ट्रकवर कारवाई केली जाणार आहे. शहरातील ही पहिलीच कारवाई असून यापुढे बोअरवेल खोदकामावर पूर्णत: बंदी असल्याचे एसडीओ तांगडे यांनी सांगितले.