स्वयं साहाय्यता समूहाचा महिलांचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:13 AM2019-02-14T00:13:53+5:302019-02-14T00:14:25+5:30
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या १६ फेब्रुवारीला पांढरकवडा येथे स्वयंम् साहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या १६ फेब्रुवारीला पांढरकवडा येथे स्वयंम् साहाय्यता समूहाच्या महिलांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
स्थानिक रामदेवबाबा ले-आऊटच्या भव्य प्रांगणात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ग्रामविकास व महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार भावना गवळी, खा.राजीव सातव, जि.प.च्या अध्यक्षा माधुरी आडे, आ.राजू तोडसाम, आ.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.राजेंद्र नजरधने, आ.श्रीकांत देशपांडे, आ.ख्वाजा बेग, आ.निलय नाईक, आ.मनोहर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात स्वयंम् सहाय्यता समूहाच्या महिलांचा सत्कार व निधी वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
कार्यक्रमस्थळी कडेकोट बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या नेतृत्वात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा व जिल्ह्याबाहेरील दोन हजार १०० पोलीस शिपाई व ४०० पोलीस अधिकारी बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत. यासोबतच पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक हे देखील कार्यक्रमस्थळी उपस्थित असतील.