कर्मकांडापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:29 PM2019-04-01T21:29:55+5:302019-04-01T21:30:11+5:30
कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : कर्मकांड करण्यापेक्षा आत्मशुद्धी अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन लातूर येथील जीवनदादा पाटील यांनी केले. अनेक दृष्टांत देऊन त्यांनी संयमित जीवनाचे महत्त्व पटवून सांगितले.
येथील दिगंबर जैन मंदिरात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. श्री १००८ बाबजी महाराज दिगंबर जैन मंदिरात भगवान आदिनाथ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पंचकल्याणकांपैकी गर्भकल्याणक व जन्मकल्याणक विधीवत संपन्न झाले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रूपचंदजी जैन होते. तर जीवनदादा पाटील यांचे धर्मविषयक प्रबोधन सोहळ्याचे आकर्षण ठरले. जीवनदादा यांनी केवळ उक्तीतून नव्हेतर कृतीतून सन्यस्त जीवनाचा आदर्श ठेवला. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा श्रावकांवर सखोल प्रभाव पडला. ओघवती वाणी साधी व सोपी भाषा शैली उपस्थितांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेली. धार्मिक वाङ्मयाच्या माध्यमातून नैतिक आचरणाला बळ मिळते. त्यासाठीच धर्मग्रंथांचे वाचन व नियमित स्वाध्याय अपरिहार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना या धार्मिक सोहळ्यात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी ‘अभिनंदन शौर्यवंदन’ असा छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात आला. त्यात डॉ.अल्फा प्रशांत यांनी अभिनंदन यांच्या पराक्रमाचे शब्दचित्र उपस्थितांसमोर मांडले. ‘कसम मुझे इस मिट्टी की मै देश नही मिटने दुंगा’ ही प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.
संस्थांचे अध्यक्ष डॉ.प्रशांत रोकडे यांनी कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ.अल्फा प्रशांत यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.