सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:37 PM2018-07-23T21:37:39+5:302018-07-23T21:37:57+5:30
येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील धामणगाव रोडवरील टिंबर भवनजवळ सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आला. राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, नगरसेविका साधना काळे, मंदा जिरापूरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकात मारपल्लीकर, योगेश लाखाणी, जगजितसिंग ओबेराय, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष अतुल मांगुळकर, परेश लाठीवाला, राजेश भूत, शैलेश दालवाला, आनंद मोर आदी उपस्थित होते.
ना. येरावार म्हणाले, शहराच्या विकासासाठी २५० ते ३०० कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणाकरिता इंग्रजकालीन अनेक झाडे हस्तांतरीत करण्यात आली, तर काही झाडे मृत झाली. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला नवीन झाडे लावणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले. सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीमबाबत वृक्षप्रेमी टावरी यांच्याकडून सर्वप्रथम माहिती मिळाली. वृक्षारोपणाच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे झाडाला १५ दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते. विशेष म्हणजे ठिबकद्वारे हे सर्व पाणी झाडाच्या मुळापर्यंत जात असल्याने शहरात एकूण तीन हजार झाडे या नवीन तंत्रज्ञानाद्वारे लावण्याचे नियोजन आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.