कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

By admin | Published: February 28, 2015 02:03 AM2015-02-28T02:03:33+5:302015-02-28T02:03:33+5:30

उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते.

Sellers'ft by paying a raw bill | कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

कच्चे बिल देऊन विक्रीकराची चोरी

Next

अविनाश खंदारे  उमरखेड
उमरखेड तालुक्यात विक्रीकर वाचविण्यासाठी बहुतांश व्यावसायिक ग्राहकाला वस्तू खरेदीचे पक्के बिल देतच नाही. कच्चे बिल देऊन त्याची बोळवण केली जाते. यातून शासनाच्या महसुलाला चुना लागत असून ग्राहकांचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमरखेड शहरासह तालुक्यात ढाणकी, मुळावा, पोफाळी, विडूळ, बिटरगाव, ब्राम्हणगाव, चातारी, जेवली, निंगनूर या मोठ्या गावांमध्ये विविध दुकाने आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तूची विक्री केली जाते. कुठलीही वस्तू विकल्यानंतर त्याची पक्की पावती देण्यात यावी, असे आदेश आहे. मात्र लाखो रुपयांचा व्यवहार असला तरी कोऱ्या कागदावरच लिहून दिले जाते. व्यावसायिकांनी वापरलेल्या या फंड्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. कारण एखादी वस्तू सदोष आढळल्यास न्याय मिळवून घेण्यासाठी त्याच्याजवळ कुठलाही पर्याय राहत नाही.
बांधकाम साहित्य विक्रेते, कापड दुकानदार, लाकूड व्यावसायिक, औषधी, जनरल स्टोअर्स, झेरॉक्स सेंटर, कृषी सेवा केंद्र आदी व्यावसायिकांनी ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूची पक्की पावती देणे बंधनकारक आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र ग्राहकाला छापील पावती दिली जात नाही. ग्राहकही आग्रह धरत नाही. मात्र काही लोकांनी पावतीची मागणी केल्यास एका कोऱ्या कागदावर वस्तूची खरेदी किंमत लिहून दिली जाते.
हा प्रकार केवळ कर चुकविण्यासाठी केल्याचे दिसून येते. पक्की पावती दिल्यास त्याचा हिशेब शासनाला सादर करावा लागतो. वर्षभराच्या उलाढालीवर व्यावसायिकाला कराची रक्कम भरावी लागते. ही रक्कम वाचविण्यासाठी पावती दिली जात नाही. मात्र त्याचा फटका ग्राहकाला बसण्याची शक्यता असते. एखादी वस्तू सदोष आढळल्यास त्याबाबत कुठेही न्याय मागता येत नाही. काही ग्राहक आग्रह करून पक्की पावती मागतात. तेव्हा संबंधित विक्रेता टोलवाटोलवी करतो. जास्तच आग्रह झाल्यास कोऱ्या कागदावर आपल्या दुकानाचा शिक्का मारून पावती दिली जाते. यावरून संबंधिताने वस्तू खरेदीबाबत संशय निर्माण होतो.
जनजागृतीचा अभाव, ग्राहकच बिल मागत नसल्याचा सुर
ग्राहक हा राजा आहे, असे म्हटले जाते. मात्र हा राजा वस्तू खरेदी करताना आपले राजतेज दाखवितच नाही. अनेकांना तर पक्की पावती कशाला असे वाटते. विशेष म्हणजे ग्राहकांमध्ये बिलांबाबत जागृतीच नाही. ग्राहक संघटनांच्यावतीनेही जनजागृती केली जात नाही. फसवणूक झाल्यास कुठे तक्रार करावी, याचीही माहिती त्यांच्याकडे नसते.
अपवाद वगळता कोणताही ग्राहक दुकानदाराला बिल मागतना दिसत नाही. ग्राहकच बिल मागत नाही तर दुकानदार स्वत:हून देणार तरी कसे, असा सवाल काही दुकानदार करीत आहे. मात्र नियमानुसार बिल देणे गरजेचे असताना उमरखेड तालुक्यात बहुतांश दुकानदार कर वाचविण्यासाठी बिलच दिसत नसल्याचे दिसते. परंतु कारवाई कोणावरही झाल्याचे दिसत नाही.

Web Title: Sellers'ft by paying a raw bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.