संमेलनाच्या कार्यक्रमात ‘वऱ्हाड’ केंद्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:52 PM2018-10-28T23:52:41+5:302018-10-28T23:54:48+5:30
येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत तीन महत्वाचे बदल केले आहे.
संमेलनाध्यक्षांची निवडणूक टाळण्यात आली. याच संमेलनाच्या निमित्ताने महामंडळाने आपला परिघ अधिक विस्तारला आहे. आतापर्यंत साहित्य महामंडळासोबत केवळ घटक संस्था, समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्थाच काम करू शकत होत्या. मात्र आता महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून ‘सहयोगी संस्था’ हा नवा प्रकार सामील केला आहे. समाजात विविध समूहांचे विविध विचार प्रवाह आहेत. त्यांच्या-त्यांच्या सातित्यिक संस्थाही आहेत. या संस्थांना अखिल भारतीय साहित्य महामंडळासोबत काम करता येणार आहे. मात्र त्यासाठी घटक संस्थेची नाहरकत असावी आणि २५ वर्षांपासून ती संस्था नोंदणीकृत असावी.
महामंडळाने केलेला तिसरा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे, संमेलनाशिवाय वार्षिक अधिवेशनही घेतले जाणार आहे. अगदी प्रारंभीच्या साहित्य संमेलनांना अधिवेशनाचेच स्वरूप होते. मात्र, काळ बदलत गेला, तशी संमेलनेही दिमाखदार सोहळ्यात रूपांतरित झाली. परंतु यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा अधिवेशने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही साहित्यविश्वासाठी मोठी देणच. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर (समता मैदान) ११, १२, १३ जानेवारीला होणाऱ्या साहित्य संमेलनाचा मुख्य केंद्र शेतकरी राहणार आहे. पहिलाच परिसंवाद शेतीविषयी होतोय. ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ असा विषय घेऊन शहरी साहित्यिकांनाच जाब विचारला जाणार आहे. त्याचवेळी ‘तत्वशील समाजघडणीसाठी आज महानुभाव, वारकरी, बसवेश्वर विचारांची गरज’ या परिसंवादात सर्वसमावेशक क्रांतीकारी विचारांचीच मांडणी होण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या परिसंवादात ‘माध्यमांची स्वायत्तता नेमकी कोणाची?’ हा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे.
तांड्यांच्या, पोडांच्या व्यथा मांडणार
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फारसे कधी चर्चेत न आलेले तांडे, पोड यवतमाळच्या संमेलनात लक्षवेधी ठरणार आहेत. बंजारा तांडे, कोलाम पोड यांचे जगणे, त्यातील अडचणी, तेथील वैशिष्ट्ये यावर विशेष चर्चा झडणार आहे. ‘कथा आणि व्यथा तांड्यांच्या पोडांच्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे जनजीवन पहिल्यांदाच सारस्वतांच्या नोंदवहीत नोंदविले जाणार आहे. तर परिसरातील वऱ्हाडी बोलीचा सन्मान करण्यासाठी खास वऱ्हाडी कविसंमेलनही होणार आहे.