ज्येष्ठ नागरिकांना ‘एसटी’ प्रवास मोफत नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:06 PM2019-06-29T22:06:11+5:302019-06-29T22:06:27+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही मोफत प्रवास सवलत योजना नाही. स्मार्टकार्ड केवळ सुविधेसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी नोंदणी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे, असे यवतमाळ विभाग नियंत्रकांनी कळविले आहे.
६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टकार्डद्वारे चार हजार किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करता येणार असल्याची माहिती पसरविली जात आहे. महामंडळाची अशी कुठलीही योजना नाही. स्मार्टकार्ड नोंदणी प्रक्रिया पुढील काळाची गरज लक्षात घेवून सुरू करण्यात आली आहे. नोंदणी होईपर्यंत सध्या चालत असलेल्या पद्धतीनुसारच प्रवास करता येणार आहे. आधारकार्ड, मतदानकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड आदी सरकारी कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने स्मार्टकार्ड प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. विद्यार्थी सवलत पास, समाजसेवक, पुरस्कार प्राप्त नागरिक, पत्रकार आणि ६५ वर्षेवयावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी करू नये, अशी विनंती विभाग नियंत्रक अविनाश राजगुरे यांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांची नोंदणीकरिता गैरसोय होऊ नये याकरिता यवतमाळ विभागातर्फे आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विभाग नियंत्रकांकडून सांगण्यात आले. स्मार्टकार्ड उपलब्ध झाले नसले तरी आधार कार्ड, मतदान कार्ड या आधारे ज्येष्ठ नागरिकांना सवलतीतच प्रवास करता येणार आहे. स्मार्टकार्ड मिळाल्यानंतर मात्र त्याचाच वापर करता येणार आहे. एसटीद्वारे चार हजार किलोमीटर मोफत प्रवास अशी माहिती पसरविली जात आहे. याकडे ज्येष्ठ नागरिकांनी दुर्लक्ष करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
नोंदणी काऊंटर वाढविण्याची गरज
महाराराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीचा लाभ घेणारे हजारो नागरिक आहेत. त्यांची स्मार्टकार्ड काढण्यासाठी गर्दी होत आहे. नोंदणीसाठी यवतमाळ बसस्थानकावर केवळ एकच काऊंटर आहे. एका नोंदणीला १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. याच पद्धतीने नोंदणी सुरू राहिल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर व्हावी यासाठी काउंटर वाढविणे आवश्यक आहे. विभागीय कार्यालयात एैसपैस जागा आहे. कर्मचारीही भरपूर आहे. याठिकाणी काऊंटर सुरू केल्यास सोयीचे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.