ज्येष्ठ नागरिक भवनाचे काम अपूर्ण
By admin | Published: September 18, 2015 02:28 AM2015-09-18T02:28:05+5:302015-09-18T02:28:05+5:30
शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनासाठी स्थानिक विकास निधीमधून विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता.
यवतमाळ : शहरातील ज्येष्ठ नागरिक भवनासाठी स्थानिक विकास निधीमधून विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता उर्वरित कामे अतिशय संथगतीने केली जात आहे.
या संदर्भात ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंत्यांकडे तक्रार केली आहे. सहायक अभियंत्यांची संमती घेऊनच सभागृहाचे मुख्यद्वार, आठ खिडक्या, ६ झरोके आदी कामे करण्यात आली. त्यासाठी ४९ हजार ९७० रुपये इतका खर्च झाला. या कामांच्या बिलाचे प्रदान अंदाजपत्रकातील तरतुदीनुसारच मिळेल, असे सहायक अभियंत्यांनी ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करताना सांगितले होते. त्यानुसारच ज्येष्ठ नागरिक भवनाची कामे करण्यात आली. मंडळाच्या सदस्यांनी लोकवर्गणी करून भवनाची ही सर्व कामे केली. मात्र, आता बांधकाम विभागाकडून बिलाची रक्कम मिळण्यात अडचणी येत आहे. उर्वरित कामांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी शाखा अभियंता कुळकर्णी यांच्याशी दोन वेळा संपर्क साधला. मात्र, सदर प्रकरणाची फाईल आपल्याकडे आलीच नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मंडळाच्या सदस्यांनी शाखा अभियंता क्षीरसागर यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी आपली बदली झाली असून या कामाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
सभागृहातील सिलिंगचे प्लास्टर खाली पडत आहे. ५ सप्टेंबर रोजी सभागृहात श्रीकृष्ण जन्मानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळातच सिलिंगचे प्लास्टर गळून खाली पडले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सिलिंगचे प्लास्टर गळत असल्याची बाब शाखा अभियंता क्षीरसागर यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. त्यांनी संबंधित कंत्राटदारास नोटीस दिली असून त्यांच्याकडून हे काम करून घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या कामासाठी किती वेळ लागेल याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाखा अभियंत्यांनी याबाबत आपण काहीही सांगू शकत नसल्याचे म्हटले. हा सर्व प्रकार ज्येष्ठ नागरिकांसाठी क्लेशदायक ठरला आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व सहायक अभियंत्यांची भेट घेऊन ज्येष्ठ नागरिकांनी सभागृहाची कामे तातडीने करण्याची मागणी केली आहे. आमदरांकडेही याबाबत साकडे घालण्यात आले. परंतु, अद्यापही ज्येष्ठ नागरिक भवनाच्या कामांना गती मिळालेली नाही. उद्यानातीलही बरीच कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे सहायक अभियंत्यांनी याकडे जातीन लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)