ज्येष्ठ गांधीवादी बाळासाहेब सरोदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 02:45 PM2020-01-16T14:45:18+5:302020-01-16T14:45:43+5:30
ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत सुहास ऊर्फ बाळासाहेब आनंदराव सरोदे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत सुहास ऊर्फ बाळासाहेब आनंदराव सरोदे यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. आयुष्यभर त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार जीवन प्रवास केला.
स्वातंत्र्य व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राष्ट्रपीता महात्मा गांधी यांनी सर्वोदय चळवळ सुरू केली. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ व निसर्ग उपचार पध्दत सुरू केली. साने गुुरूजी यांनी आंतरभारती व आचार्यकुलाची स्थापन केली. या सर्वांमध्ये गांधी विचार हा समान धागा होता. या सर्व चळवळीत बाळासाहेब सरोदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक चळवळी गाजविल्या. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सरोदे यांनी स्वत:च्या मालकिची १०० एकर जमीन दान दिली. आयुष्यभर त्यांनी गांधी विचारांचा वारसा जपला. त्यानुसार आचारण केले. त्यामुळे त्यांची विदर्भात ज्येष्ठ गांंधीवादी विचारवंत म्हणून ओळख होती.
सरोदे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत खादीच्या कपड्यांचाच वापर केला. यवतमाळात ते गेल्या २५ वर्षांपासून कस्तुरबा निसर्गोपचार योग महाविद्यालय चालवित होते. गुुरू वार, १६ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे अड. असिम आणि अमित ही दोन मुुले, अड. स्मिता सिंगलकर-सरोदे ही विवाहीत मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. बाळासाहेब सरोदे यांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी त्यांचे नेत्र स्विकारले. शुक्रवार, १७ जानेवारीला सकाळी १० वाजता त्यांच्या दर्डा नगरस्थित निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे. स्थानिक पांढरकवडा रोडवरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.