ज्येष्ठांनी दिला मंत्र, ‘पेपर वाचाल तरच वाचाल’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:00 AM2020-04-08T05:00:00+5:302020-04-08T05:00:32+5:30
वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि शेंबाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत.
नंदकिशोर बंग ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंबाळपिंपरी : वृत्तपत्रांच्या वाटपातून कोरोनाचा फैलाव होतो, अशी अनाठायी भीती जनमानसात पसरविण्यात आली होती. त्यातून काही दिवस वृत्तपत्रांची छपाई देखील बंद ठेवावी लागली होती. मात्र आता खुद्द वाचकांनीच वृत्तपत्रांचे मोल ओळखून सामूहिक वाचन सुरू केले आहे. पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरीतच एका ज्येष्ठ नागरिकाने चक्क स्वत:च ‘लोकमत’चे अनेक अंक विकत घेऊन अनेकांना वाटप करण्याचा विडाच उचलला आहे.
वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि शेंबाळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत. या जुन्या जाणत्या व्यक्तिमत्वाचे रवींद्र महल्ले हे नाव पंचक्रोशित सर्वपरिचित आहे, ते त्यांच्या सुधारणावादी वर्तनामुळेच. त्या सुधारणेचेच हे एक पुढचे पाऊल.
रवींद्र महल्ले हे परिसरातील ज्येष्ठ गरजू नागरिकांना दररोज स्वखर्चाने ‘लोकमत’ वृत्तपत्र वितरित करीत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सारा देश हवालदिल झालेला आहे. या विषाणूमुळे ज्येष्ठ नागरिकांचाच अधिक बळी घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये एक प्रकारे दहशतीचे वातावरण आहे. या भीतीपायी अनेकांनी वृत्तपत्रे वाचणे सोडून दिले होते. मात्र त्यांच्या मनातील भीती घालविण्यासाठी तसेच त्यांना विरंगुळा मिळावा या हेतूने रवींद्र महल्ले यांनी वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम सुरू केला आहे. वृत्तपत्रातून जीवदान मिळविण्याचा मार्ग मिळेल असा कृतीशिल संदेश महल्ले यांनी दिला.
‘लोकमत’ परिवाराकडून दखल
लॉकडाऊनच्या काळात इच्छा असूनही अनेकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचणे कठीण झाले आहे. वाचनाचा ध्यास असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक दररोज वृत्तपत्रांसाठी तळमळत आहे. अशा ज्येष्ठांची निवड करून रवींद्र महल्ले यांनी वृत्तपत्र वितरणाचा उपक्रम सुरू केला.