“भारताची अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या वाटेवर, मोदी सरकारला विरोधी पक्ष संपवून टाकायचाय”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 08:17 PM2022-04-09T20:17:39+5:302022-04-09T20:20:28+5:30
ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
यवतमाळ: देश कॉंग्रेसमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. याचाच अर्थ देशातील विरोधी पक्ष सरकारला संपवून टाकायचा आहे. मजूबत लोकशाहीसाठी विरोधी पक्ष जीवंत असणे गरजेचे आहे, मात्र विविध यंत्रणांचा वापर करून ठरवून कारवाई केली जात असल्याने सध्या विरोधी पक्षच दहशतीत आल्याचे ज्येष्ठ पत्रकार आशुतोष म्हणाले. देशाची अर्थव्यवस्था सध्या चिंताजनक असून भारतही श्रीलंकेच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने यवतमाळमध्ये समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमित्ताने व्याख्यानासाठी आले असता आशुतोष यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशुतोष यांनी चिंता व्यक्त केली. आणीबाणीच्या काळातही नव्हती, अशी केविलवाणी परिस्थिती सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची झाली आहे. एक प्रकारे देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्याचे सांगत, कधी काय घडेल याचा नेम नाही. श्रीलंकेची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने कोसळली, त्याच मार्गावरून भारताचीही वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
देशातील राजकीय वातावरणाबाबतही आशुतोष यांनी चिंता व्यक्त केली. समाज माध्यमाचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी केला जात आहे. याच बाबी चांगल्या कशा आहेत हे या माध्यमाद्वारे ठसविले जात आहे. त्याच वेळी प्रसार माध्यमांवरही सरकारने नियंत्रण ठेवले असून त्यामुळेच देशातील बेरोजगारी, महागाईसारख्या अत्यंत महत्वाच्या जीवनमरणाच्या विषयावर साधी चर्चाही होत नाही. देशाच्या उत्पन्नाचा दर चिंताजनक पातळीवर खालावला आहे. मात्र सरकारला त्याचीही चिंता असल्याचे दिसत नाही. देशातील लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज असते. मात्र भाजपाविरोधात असलेल्यांवर इडी सारख्या संस्थांद्वारे कारवाई करून विरोधकांचे तोंड बंद करण्याचा एकमुखी कार्यक्रम राबविला जात आहे.
भाजपातील सर्वच नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ कसे असा प्रश्नही आशुतोष यांनी उपस्थित केला. आप पक्षाने दिल्लीनंतर पंजाब राज्यातही विजय मिळविला आहे. त्यासाठी आपने आठ वर्ष कठोर मेहनत केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून सध्या २०२४ ची ट्रायल सुरू आहे. देशात त्यामुळेच धार्मिक विद्वेष पेरला जात आहे. त्याद्वारे पुन्हा सत्ता मिळवू असा भाजपचा कयास आहे. मात्र पुढील दोन वर्ष अत्यंत महत्वाची असून या दोन वर्षातील घडामोडीच २०२४ चे भवितव्य ठरवितील असे ते म्हणाले.