सर्पदंशाने विद्यार्थी मृत्यूचा ‘सीएम’ने अहवाल मागितला
By admin | Published: July 19, 2016 02:40 AM2016-07-19T02:40:20+5:302016-07-19T02:40:20+5:30
कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे
पांढरकवडा : कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे. त्यांनी या प्रकरणी तातडीने चौकशी अहवाल मागितला आहे.
आदित्य टेकाम असे या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंतरगाव येथे शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा चालविली जाते. तेथे सहाव्या वर्गात शिकणारा आदित्य हा रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शाळेच्या आवारात खेळत असताना त्याला सर्पदंश झाला. त्याला यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता रात्री ८ वाजता त्याचा मृत्यू झाला. आदिवासी विद्यार्थ्याच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वच आश्रमशाळांसाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र मध्यंतरीच्या काळात या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले. त्याचाच फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. आश्रमशाळांचे कंपाऊंड तुटले आहे. मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या गवतात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढला असून त्यातूनच आदित्यचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.
पांढरकवडा प्रकल्पांतर्गत २१ शासकीय आश्रमशाळा, २८ अनुदानित आश्रमशाळा, १९ आश्रमशाळा व पांढरकवडा प्रकल्प कार्यालय असा भलामोठा आवाका आहे. मात्र तेथील समस्या कायम आहे. तेथील सहायक प्रकल्प अधिकाऱ्याची चार तर आदिवासी विकास अधिकाऱ्याची सात पदे रिक्त आहेत. अनेकदा कार्यालयीन कामकाजासाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर नेमले जाते. त्याचा परिणाम आश्रमशाळांच्या कामकाजावर होतो. मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना शिक्षक व कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. निवासस्थानांमध्ये सोई-सुविधा नसल्याने तेथे कुटुंबासह राहणे शक्य नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
अंतरगाव येथील सर्पदंश मृत्यूप्रकरणाने जिल्हाभरातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अंतरगाव प्रमाणेच अन्य आश्रमशाळांमध्येही गवत, झुडूपे वाढलेली आहेत. त्यामुळे तेथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना हे मयत विद्यार्थ्याच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन करणार असल्याचे सांगण्यात आले. मृताच्या कुटुंबियांना ७५ हजारांची तातडीची मदत दिली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)
मेटीखेडा आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर असते तर...
४आदित्य टेकाम या विद्यार्थ्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्याला मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे आदित्यला रुग्णवाहिकेत टाकून यवतमाळला भरती करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी ६ वाजता त्याला जोराचा झटका आला आणि आणखी दोन तासाच्या उपचारानंतर त्याचा ८ वाजता मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. तर काही जण आदित्यचा मृत्यू वाटेतच झाल्याचे सांगत आहे. मेटीखेडा येथे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असते तर कदाचित आदित्यचा जीव वाचला असता असा सूर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे किशोर तिवारी यांनी सांगितले.