सर्विस रोड बनले चक्क मृत्यूचे सापळे
By admin | Published: May 21, 2017 12:30 AM2017-05-21T00:30:46+5:302017-05-21T00:30:46+5:30
भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.
दारव्हा मार्गावर दररोज अपघात : सर्वाधिक दुचाकी वाहनांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव वेगाची ‘झिंग’ चढलेल्या वाहनचालकांसाठी शहरातील दारव्हा मार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे. दररोज होणाऱ्या अपघातात कुणाचा हात, कुणाचा पाय तर कुणाचे डोके फुटून रुग्णालयात जात आहेत. सर्वाधिक अपघात दुचाकीचे असून, या मार्गावरील अशास्त्रीय दुभाजक आणि सर्विस रोड अपघातास कारणीभूत ठरत आहेत.
यवतमाळ शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणजे दारव्हा मार्ग होय. दारव्हा नाका ते लोहारा चौफुलीपर्यंत या रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावण्यात आले आहे. या मार्गावर गत काही वर्षांपासून दरररोज अपघात घडत आहेत. नेहमी त्याच त्या ठिकाणी अपघात होत आहेत. सर्वाधिक अपघातप्रवण स्थळ म्हणजे उद्योग भवनासमोरील श्रीकृष्णनगरकडे वळणाऱ्या दुभाजकातील ‘गॅप’ होय. यासोबतच एकवीरा चौक, महावीर नगर, दारव्हा नाका, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी दररोज अपघात होत आहेत. भरधाव येणारे दुचाकीचालक एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. गत आठवड्यात एक शिक्षक उद्योग भवनासमोरून श्रीकृष्णनगरकडे वळत होते. त्याचवेळी लोहाराकडे भरधाव जाणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की शिक्षक पाच फुट उसळून त्यांचे डोके दुभाजकाच्या दगडावर आपटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात भरती केले. सध्या नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केवळ क्षणभराचा ‘गॅप’ त्यांना आयुष्यभर अपंग करणारा ठरला.
महावीर नगरासमोरील दुभाजकातील ‘गॅप’मध्येही (सर्विस रोड) अनेकदा वाहने एकमेकांवर धडकतात. दारव्हा नाक्याकडून येणारे महावीरनगरकडे वळताना लोहाराकडून येणारे वाहन धडकते. अशीच अवस्था एकवीरा चौकातही झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक अपघात सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान होतात. दुचाकीच अपघात नव्हे तर अनेकदा मोठ्या वाहनांचेही अपघात या भागात झालेले आहे. सहज नजर टाकली तरी ठिकठिकाणी वाहनांच्या फुटलेल्या काचांचे तुकडे दिसून येतात. या भरधाव वाहनांना नियंत्रणात आणण्यासाठी असलेले गतिरोधकही कुचकामी ठरले आहेत. गतिरोधकांची लेव्हल रस्त्याच्या बरोबरीनेच आली आहे. त्यामुळ वाहनचालकाला वेग कमी करण्याची गरजच भासत नाही आणि नेमका त्याचवेळी अपघात होतो.
अशास्त्रीय दुभाजक
यवतमाळ-दारव्हा मार्गावर असलेल्या दुभाजकांत अशास्त्रीय पद्धतीने गॅप ठेवल्या आहे. नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर दुभाजकांमध्ये गॅप आहे. वाहनधारक मागे-पुढे न पाहता आपल्याच तोऱ्यात वाहन वळवितात आणि त्याचेवेळी भरधाव येणारे वाहन त्यावर आदळते. दुभाजकांमध्ये गॅप हे नगरात जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी समारोसमोर असू नये. थोड अंतर ठेवून गॅप ठेवण्याची मागणी आहे. यवतमाळ शहरातील महादेव मंदिर मार्गावरील दुभाजकाला अगदी शास्त्रीय पद्धतीने गॅप आहे. खासगी रुग्णालयातून येणारी वाहने बरोबर वळण घेऊन तिरंगा चौकातून जातात. तोच गॅप जर अगदी त्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर असता तर तो ही अपघातास कारणभूत ठरला असता. अशाच पद्धतीने दारव्हा मार्गावरील दुभाजकामधील गॅप ठेवण्याची गरज आहे.