पुसदमध्ये साकारणार सात कोटींचे वन भवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:26 PM2017-12-28T23:26:28+5:302017-12-28T23:26:55+5:30
येथील पोलीस ठाण्यासमोर असलेली वन कर्मचाऱ्यांची शिकस्त इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त वन भवन उभारले जाणार आहे. त्याचे बजेट सात कोटी ४० लाख रुपये एवढे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पोलीस ठाण्यासमोर असलेली वन कर्मचाऱ्यांची शिकस्त इमारत पाडून त्या जागेवर प्रशस्त वन भवन उभारले जाणार आहे. त्याचे बजेट सात कोटी ४० लाख रुपये एवढे आहे.
पुसदला नगरपरिषदेजवळ वन कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. १२ फेब्रुवारी १९६४ ला पुसद येथे विभागीय वन अधिकारी कार्यालय स्थापन झाले होते. पी.पी. लेले हे पहिले विभागीय वन अधिकारी होते. १९६४ ला बांधलेली ही वसाहत आता जीर्ण झाली आहे. तरीही जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांचे कुटुंब तेथे राहते. हीच शिकस्त इमारत पूर्णत: पाडून तेथे नव्याने तीन मजली इमारत वन भवन म्हणून उभारली जाणार आहे. त्यात उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, भरारी पथक आदींची कार्यालये राहणार आहेत. याशिवाय अधिकाºयांचे निवासस्थान, किमान १४ कर्मचाऱ्यांचे कुटुंब राहू शकतील, अशी निवासस्थाने समाविष्ठ आहेत.
सात कोटी २४ लाख २९ हजार रुपये बजेट असलेल्या या वन भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपवनसंरक्षक कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपवनसंरक्षक अरविंद मुंढे (आयएफएस) यांनी हा संपूर्ण निधी पुसदच्या कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे ७ डिसेंबर रोजी वर्ग केला आहे. बांधकाम विभागाकडून लवकरच या संबंधीची निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण, पुसदचे डीएफओ अरविंद मुंढे यांचा पाठपुरावा या कामी महत्वाचा ठरला. पुसद येथील वन विभागाचे कार्यालय सध्या भाड्याच्या इमारतीत थाटले आहे.
लवकरच हे कार्यालय बांधकामानंतर स्वत:च्या इमारतीत नेले जाणार आहेत. पुसद, दिग्रस, महागाव, उमरखेड या चार तालुक्यांचे वन मुख्यालय पुसदमध्ये आहे. त्या अंतर्गत पुसद, मारवाडी, दिग्रस, काळी दौलत, महागाव, उमरखेड व शेंबाळपिंपरी हे सात वन परिक्षेत्र या वन विभागात समाविष्ट आहेत.