दारव्हा येथे कोरोना रुग्ण वाढल्याने सात दिवस ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 05:00 AM2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:31+5:30

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २० वर पोहोचली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला मुंबईवरुन आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर एका महिलेचा नागपूर येथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

Seven-day 'public curfew' over corona outbreak in Darwha | दारव्हा येथे कोरोना रुग्ण वाढल्याने सात दिवस ‘जनता कर्फ्यू’

दारव्हा येथे कोरोना रुग्ण वाढल्याने सात दिवस ‘जनता कर्फ्यू’

Next
ठळक मुद्देप्रशासन तयारीत : एकूण २१ कोरोना पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू, संपर्कातील संख्येतही मोठी वाढ, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : शहरात अचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या परिसरात चांगले मॉनिटरींग करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासन तयारी करीत असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २० वर पोहोचली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला मुंबईवरुन आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर एका महिलेचा नागपूर येथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिच्या थेट संपर्कातील सुरुवातीला तीन आणि नंतर तब्बल ११ जण बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाजीनगर परिसरात एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पुसद येथील रहिवासी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर टिळकवाडीतील पुरुष व खाटीकपुरा परिसरातील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे स्वॅब घेतले असता ते पॉझिटिव्ह आले. तसेच ज्या मृतदेहाच्या स्वॅब घेण्यावरून वाद झाला तोही व्यक्ती मृत्यूनंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा २१ वर पोहोचला. तर या व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या दृष्टीने शहरवासीयांनी सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे.
कोरोनाची वाढत असलेली साखळी तोडण्यासाठी ठराविक परिसर सील करण्याशिवाय पर्याय नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. प्रतिबंधित परिसरात येण्या-जाण्यावर निर्बंध राहील. येथील रहिवाशांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची तयारी नगरपरिषदेच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून पासेस दिल्या जातील.

जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासह विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी दारव्हा येथे भेट दिली. त्यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. पुढील १४ दिवस जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक स्वत: दारव्हा येथे येऊन आढावा घेणार आहेत. तर अपर पोलीस अधीक्षक नुरूल हसन पूर्णवेळ येथे राहणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी १४ दिवस या ठिकाणी राहणार आहे. तसेच एक अतिरिक्त तालुका आरोग्य अधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील एका चांगल्या व्यक्तीची नेमणूक करून नागरिक व प्रशासनामधील दुवा म्हणून ते काम करतील, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Seven-day 'public curfew' over corona outbreak in Darwha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.