सात जणांची कोरोनावर मात; तरी महिनाभरापासून रूग्णालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 05:00 AM2021-07-16T05:00:00+5:302021-07-16T05:00:26+5:30
आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना पोस्ट कोविडने त्रस्त रुग्णांचीही संख्या प्रचंड कमी झाली आहे. सध्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन विकार विभागात सात रुग्ण उपचाराला येत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने फुफ्फुसावर परिणाम होतो. ज्यांचा स्कोअर १५ ते २० इतका होता, अशा रुग्णांच्या फुफ्फुसात न्युमोनिया कायम असतो. त्यांना ऑक्सिजनची गरज भासते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गानंतर त्यातून बाहेर पडल्यावरही अनेक गंभीर परिणाम रुग्णांमध्ये दिसून आले. दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात असे रुग्ण महिनांगणती पोस्ट कोविडचा उपचार घेत होते. शासकीय कोविड हाॅस्पिटलमध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डच उघडण्यात आला होता. आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असताना पोस्ट कोविडने त्रस्त रुग्णांचीही संख्या प्रचंड कमी झाली आहे. सध्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वसन विकार विभागात सात रुग्ण उपचाराला येत आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाने फुफ्फुसावर परिणाम होतो. ज्यांचा स्कोअर १५ ते २० इतका होता, अशा रुग्णांच्या फुफ्फुसात न्युमोनिया कायम असतो. त्यांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यातून बाहेर पडण्यासाठी नियमित वाफारा घ्यावा लागतो. चेस्ट फिजिओथेरपी घेतल्यास लवकर आराम पडतो. शिवाय, श्वसनाचा व्यायाम, याेगासने केल्यानंतर फुफ्फुसाची झीज बऱ्यापैकी भरून काढता येते. त्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वृद्धिंगत होत हळूहळू त्रास कमी होतो.
कोरोनातून बरा, पण श्वसनाचा त्रास
- कोरोनामुक्त झाल्यानंतरही फुफ्फुसावरचे व्रण कायम असतात. त्यामुळे त्रास होतो.
- कोरोनातून बाहेर आलेल्यांना किमान एक महिना तरी शारीरिक हालचाली करताना दम लागतो.
- मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येऊन खोकल्याचा त्रासही जाणवतो. त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका हा ज्येष्ठांना सर्वाधिक असल्याचे पहिल्या व दुसऱ्या लाटेतून पुढे आले आहे. मृत्यू दरामध्ये वयोवृद्धांचेच प्रमाण सर्वाधिक होते. त्यातही इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना कोरोना विषाणूने सर्वाधिक प्रमाणात पछाडले. ही आकडेवारी या दोन्ही लाटेतून दिसते.
बरे झाल्यानंतरही घ्या काळजी
- कोरोना झालेल्यांनी संतुलीत आहार घेऊन शरीराची झीज भरून काढणे गरजेचे आहे.
- फुफ्फुसात न्युमोनिया असल्यास ऑक्सिजन लागतो. वाफारा घ्यावा, चेस्ट फिजिओथेरपी घ्यावी.
- कोविडमधून बाहेर आल्यानंतर किमान एक महिना फार शारीरिक श्रम करणे टाळावे.