फळ व्यापाऱ्याकडे सात लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:51 PM2019-08-19T21:51:25+5:302019-08-19T21:53:40+5:30
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने होत आहे. रविवारी रात्री ९ वाजता पांढरकवडा रोडवरील गुलशननगर येथील फळ व्यापाºयाचे घर चोरट्यांनी फोडले. ते कुटुंबासह साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले असताना चोरट्यांनी डाव साधला. तब्बल पाच लाख ४७ हजारांची रोख आणि दीड लाख रुपये किमतीचे सोने चोरी गेले.
मोहंमद हफीज मोहंमद साहब रा. गुलशननगर पांढरकवडा रोड यांच्याकडे अज्ञात चोरट्याने चोरी केली. हफीज यांचा फळांचा व्यापार आहे. फळांच्या व्यापारातून मिळालेली रक्कम त्यांनी घरीच दिवाणमध्ये लोखंडी पेटीत ठेवली होती. रविवारी ते कुटुंबासह मेराज लॉन येथे साक्षगंधाच्या कार्यक्रमाला गेले होते. तर हफीज यांचा मोठा मुलगा मोहंमद कासीफ हा मित्रांसोबत फिरायला गेला होता. नंतर तो घरी परत आला. तेव्हा त्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्याने चोरी झाल्याची माहिती वडील मो. हफीज यांना दिली. घरात येऊन बघितले असता सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. कपाटाला चाबी लागलेली होती. त्यामुळे चोरट्याला कोणतेचे प्रयत्न करावे लागले नाही. त्याने ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने काढले. तर दिवाणमध्ये असलेल्या लोखंडी पेटीतील पाच लाख ५७ हजार रुपये लंपास केले.
ही घटना रविवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान घडली. अतिशय वर्दळीचा परिसर म्हणून गुलशननगर ओळखल्या जातो. घराचे कुलूप तोडताना आवाज झाला असता, मात्र तोही पहिल्या मजल्यावर राहणाºया भाडेकरूंना ऐकायला आला नाही. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांच्या तपासाची दिशा सध्या तरी स्थानिकांवरच केंद्रित आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी भेट दिली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वान त्याच परिसरात घुटमळले. शिवाय चोरीच्या ठिकाणावरून ठसे तज्ज्ञांनी काही नमुने गोळा केले आहे. सायबर सेलच्या टीमनेही घटनास्थळावर पाहणी केली. अद्याप पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित नसली तरी हा गुन्हा नक्कीच उघडकीस येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
मोठी रक्कम गेल्याची चर्चा
या घरफोडीमध्ये रेकॉर्डवर सात लाख रुपये चोरी गेल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र मोठी रक्कम गेल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये आहे. कायम वर्दळ असलेल्या गुलशननगरात आजपर्यंत भंगारही चोरीला गेले नाही. अशात सात लाखांची घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे.