दत्त चौकात सलग दुसऱ्या दिवशीही सात दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:17+5:30
अवधुतवाडी ठाण्यातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद व्यापारी संकुलात पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान दुकाने फोडली. याचा गुन्हा दाखल होत नाही तोच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी त्याच वेळेत सात दुकाने फोडली. यातील तीन दुकानातून मुद्देमाल लंपास केला. चोरटे पोलिसांवर हावी झाले असून त्यांनी खुले आव्हान उभे केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या मध्यभागात असलेल्या दत्त चौक परिसरात नगरपरिषदेचे व्यापारी संकूल आहे. या व्यापारी संकुलातील दुकानांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. सलग दोन दिवसात १२ दुकाने फोडून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी रात्री दुकान फोडल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी सात दुकाने फोडली.
अवधुतवाडी ठाण्यातील पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नगरपरिषद व्यापारी संकुलात पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान दुकाने फोडली. याचा गुन्हा दाखल होत नाही तोच दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी त्याच वेळेत सात दुकाने फोडली. यातील तीन दुकानातून मुद्देमाल लंपास केला. चोरटे पोलिसांवर हावी झाले असून त्यांनी खुले आव्हान उभे केले आहे. हे सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यानंतरही पोलिसांना त्यांचा शोध घेता आला नाही. चोरी झालेल्या ठिकाणी पुन्हा चोरटे येणार नाही अशाच अविर्भावात पोलीस राहल्याने चोरट्यांनी त्याच व्यापारी संकुलात पुन्हा हात साफ केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोर तोंडाला पट्टी बांधून दुकाने फोडत असल्याचे स्पष्ट दिसते. यातील तिघे जण दुकानाचे शटर वाकवून एक दुकानात शिरतो. आतील मुद्देमाल काढून बाहेर टाकतो, असा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला आहे. चोरट्यांनी नगरपरिषद व्यापारी संकुलात सर्वच दुकानांना फोडण्याचा प्रयत्न केला. ज्याठिकाणी शटर वाकले अशा ठिकाणी चोरट्यांनी हात मारला.
अवधूतवाडी पोलीस ठाण्याची लक्तरे वेशीवर
चोर बिनधास्तपणे वावरत असल्याने शहरात पोलीस आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यवतमाळ शहरातील चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. जिल्हा पोलीस दलाच्या नामुष्कीवर केवळ एलसीबीने केलेल्या दोन-तीन धडक कारवायांमुळे पांघरूण टाकले जात आहे. दुर्दैवाने पोलीस ठाणेस्तरावर गुन्ह्यांचा शोध लावण्याचे प्रमाण नसल्यातच जमा आहे. एकीकडे पोलीस यंत्रणेकडून अनेक दावे होत असले तरी प्रत्यक्षात चोरट्यांचीच दहशत मोडीत काढण्यात सपशेल अपयश आले आहे. दत्त चौक व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतरही पोलीस तपास यंत्रणा गतिमान झाली नाही.
या व्यावसायिकांची फोडली दुकाने
शारिक शेख यांच्या नोबल एंटरप्रायजेस या बूक स्टॉलमधून १७ हजार रोख, एअर लिंक कम्युनिकेशन या सूमंत शेटे यांच्या दुकानातून लॅपटॉप, सीए राहुल लोळगे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप लंपास केला. याशिवाय मनीष गोडबोले यांचे मनिष अॅग्रो, अभियंता कनोजे यांचे कार्यालय, मिलिंद जिरापुरे यांचे माया कॉम्प्यूटर या दुकानांनाही फोडण्याचा प्रयत्न केला. शारिक शेख यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
शोध पथकांचे हातावर हात
सातत्याने शहरात घरफोड्या, दुकान फोडण्याचे गुन्हे होत आहेत. मात्र अजूनही चोरांचा माग काढता आलेला नाही. सातत्याने घटना घडत असतानाही शोध पथकांनी आपल्या कामाची गती वाढविलेली नाही. स्थानिक गुन्हे शाखेत विविध पथक सक्रिय आहेत. विशेष करून शहराची जबाबदारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाने आतापर्यंत एकही भरीव कामगिरी केलेली नाही. केवळ अधिनस्त कर्मचाºयांच्या कानाफुसीवरून अहवाल पाठविण्याचे काम सुरू आहे. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे थोडेबहुत नेटवर्क आहे, काम करण्याची क्षमता आहे अशाच कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एलसीबीत नियमित क्लास होत नसल्याने पाय ओढण्याचे काम जोरात सुरू आहे. चमकोगिरीला वाव मिळत असल्याने खबºयांचे नेटवर्क असलेल्यांना डावलले जात आहे.