पंच्याहत्तरीपार आजी-आजोबांनी दिली परीक्षा; यवतमाळच्या रामपुरे दाम्पत्याची खास कहाणी
By अविनाश साबापुरे | Published: March 18, 2024 01:55 PM2024-03-18T13:55:16+5:302024-03-18T13:56:33+5:30
७५ वर्षे वयाचे मणिराम रामपुरे आणि सखुबाई रामपुरे या दाम्पत्याने कार्ली येथे नवभारत साक्षरता अभियानाची परीक्षा दिली.
अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: अर्धे वय उलटून गेले... शेतमजुरी करता-करता पाटीपुस्तकांशी नातेच तुटले... पण एवढे दिवस अज्ञानाचा अंधकार सोसल्यानंतरही मनात शिकण्याची ऊर्मी कायमच होती... नेमकी हीच ऊर्मी घेऊन रविवारी हजारो बाया-बापड्यांनी शाळेत हजेरी लावली अन् तीन तास एकाच जागी स्थिर बसून परीक्षा दिली. पंच्याहत्तरी ओलांडलेल्या असाक्षरांनी परीक्षेतून आनंद घेतला.
केंद्राच्या नव भारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत केव्हाही या अन् परीक्षा द्या, अशी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक खेड्यातले नोंदणीकृत निरक्षर सकाळीच वावरात गेले. दुपारी जेवण आटोपून परीक्षेला आले. प्रौढ परीक्षार्थी अगदी मन लावून, मग्न होऊन प्रश्नपत्रिका सोडविताना दिसून आले. आता १५० पैकी ५१ म्हणजेच किमान ३३ टक्के गुण घेणाऱ्या निरक्षर प्रौढांना साक्षर झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
कारागृहातही परीक्षेची सोय... घरातूनही पेपर!
ज्या जिल्ह्यात कारागृहातील प्रौढ व्यक्तीची उल्लास ॲपवर नोंदणी झालेली आहे, त्याच्यासाठी कारागृह प्रमुखांमार्फत माहिती घेऊन कारागृहातच परीक्षा केंद्र देण्याची सूचना योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी केली होती, तर शारीरिकदृष्ट्या अक्षम, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी त्यांच्या घरी किंवा दवाखान्यातच पेपर सोडविण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आली होती.