आर्णी तालुक्यातील २३ गावांत तीव्र पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:36+5:30
नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.
राजेश कुशवाह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : मे महिना लागताच तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस पारा चढत आहे. तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, बोअर, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटू लागल्या आहे. त्यामुळे तालुक्यातील २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
तालुक््यात पाणी पातळी खोल जात आहे. नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी असणाऱ्या विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. आता हे प्रस्ताव तहसीलकडे पाठविण्यात आले आहे.
तालुक्यातून अरुणावती, पैनगंगा, अडाण या तीन मुख्य नद्या वाहतात. या तिनही नदी पात्रातील पाणी कमी होत आहे. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. कापेश्वर, आमणी, बोरगाव, अंबोडा, तरोडा, धनसिंग हेटी, लोनबेहळ, गणगाव, साखरतांडा, सुधाकरनगर, कोसदणी, शिवर, भंडारी, सावळी-सदोबा, जांब, कुऱ्हा, डुमणी, मुकिंदपूर, भानसरा, वरूड तुका, देऊरवाडी, शिरपूर, कवठाबाजार आदी २३ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तेथील ग्रामपंचायतींनी गावाशेजारी पाणी असणाऱ्या खासगी विहिरी अधिग्रहित करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहे. यापैकी कापेश्वर, आमणी, बोरगाव दा., अंबोडा, तरोडा आदी १९ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर झाले आहे.
तालुक्यातील पाळोदी, सुधाकरनगर या दोन गावांत तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील ग्रामपंचायतीने गावात टँकरद्वारा पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. यातील सुधाकरनगर येथे १८ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
७५ लाखांचा कृती आराखडा
तालुक्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. त्यामुळे यंदा तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचायत समितीने पाणीटंचाई उपाययोजनांसाठी ७४ लाख ७६ हजारांचा कृती आराखडा तयार केल्याची माहिती गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिली. दरम्यान, ११ गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.