विदर्भातील चार जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा; ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 01:47 PM2022-05-20T13:47:25+5:302022-05-20T13:53:56+5:30
सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती आहे.
यवतमाळ : मागील पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने विदर्भातील बहुतांश प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असल्याने विदर्भातील ११ पैकी सात जिल्ह्यांत यंदा अद्यापपर्यंत पाण्याचा टँकर लागलेला नाही. परंतु, चार जिल्ह्यांना मात्र टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, या जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाळा कठीण जातो. तापमानाचा पारा चढा असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक कासावीस झालेले दिसतात. मागील दोन पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झालेला असल्याने मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी मात्र बहुतांश जिल्ह्यात पाण्यासाठी संघर्ष दिसत नाही. त्यामुळेच मे महिन्याच्या मध्यंतरानंतरही अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांत अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मागील वर्षी यातील सहा जिल्ह्यांतील १२ गावांमध्ये दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.
बुलडाणा, यवतमाळमध्ये सर्वाधिक टँकर
१९ मे रोजी विदर्भातील ११ पैकी चार जिल्ह्यांतील ५७ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक १९ टँकर बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातील पाच गावांना पाण्यासाठी टँकरची गरज भासली आहे. तर अमरावती जिल्ह्यात १४ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली.
आठवड्यात टँकरची संख्या झाली दुप्पट
मागील आठवड्यात राज्यातील २८१ गावे आणि ७३८ वाड्यांना २७० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र मेमध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत गेल्या तसा पाण्याचा प्रश्नही जटिल झाला. आठवडाभरातच तहानलेल्या गावांची संख्या साधारण दुपटीवर गेली आहे. १९ मे रोजी राज्यातील ४०२ गावे आणि ९६५ वाड्यांना ३५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा कोकणाला
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ५७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अद्यापपर्यंत टँकरची गरज भासलेली नाही. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ३७ गावांना ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील ५९ गावांमध्ये ६४ टँकर सुरू आहेत. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत २७ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर कोकणातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १४४ गावे आणि ४५७ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात येत आहे.