नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदीत सावळा गोंधळ
By admin | Published: March 19, 2017 01:31 AM2017-03-19T01:31:51+5:302017-03-19T01:31:51+5:30
येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल खरेदी
शेतकऱ्यांना नकार : कार्यकर्त्यांच्या मालाला प्राधान्य
पुसद : येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यापेक्षा कार्यकर्त्यांचा माल प्राधान्याने घेण्याकडे कल वाढीस लागला आहे. या प्रकारामुळे खरेदीसाठी तासन्तास ताटकळत बसणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादित तुरीला हमी भाव मिळावा म्हणून पुसद शहरात नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र आवक वाढल्याने या खरेदी केंद्रावरील नियोजन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. तुरीचे मोजमाप करताना वशिलेबाजी केली जात आहे. सात-सात दिवस ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे मोजमाप करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सध्या सुगीचे दिवस असले तरी शेतकरी शेतातील कामे सोडून तूर विक्री करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्काम ठोकून आहेत.
येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून विविध समस्या पुढे केल्या जात आहे. कधी बारदाना नसल्याने तर कधी पणन मंडळाच्या वेअर हाऊसमधील अडचणीमुळे केंद्र बंद राहात आहे. अनेकदा तर हमाल नसल्यामुळेही केंद्र बंद ठेवले गेले. आठवडाभर खरेदी बंद राहात असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. मालाच्या राखणीसाठी शेतकऱ्यांना उघड्यावरच रात्र जागून काढावी लागत आहे. मागील काही दिवसांपासून माप सुरळीत सुरू झाले तरी त्यासाठीही वशिलेबाजी होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. सहा दिवसांपासून तूर खरेदीच झालेली नाही. अद्यापही पाच ते सहा हजार क्विंटल तूर मोजमापाविना बाजार समितीच्या आवारात पडून आहे. संंबंधितांनी याकडे लक्ष देऊन वेळेवर तुरीचे मोजमाप करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)